बीसीसीआयच्या 'वॉर्निंग'नंतर श्रेयस अय्यर लाइनवर, रणजी ट्रॉफी खेळताना दिसणार-shreyas iyer put himself available for the ranji trophy game against tamil nadu ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  बीसीसीआयच्या 'वॉर्निंग'नंतर श्रेयस अय्यर लाइनवर, रणजी ट्रॉफी खेळताना दिसणार

बीसीसीआयच्या 'वॉर्निंग'नंतर श्रेयस अय्यर लाइनवर, रणजी ट्रॉफी खेळताना दिसणार

Feb 27, 2024 06:56 PM IST

Shreyas Iyer Available for Ranji Trophy : रणजी ट्रॉफीचे सेमी फायनल सामने २ मार्चपासून सुरू होणार आहेत. यात मुंबईचा सामना तामिळनाडूशी होणार आहे.

Shreyas Iyer Available for Ranji Trophy
Shreyas Iyer Available for Ranji Trophy (PTI)

टीम इंडियाचा फलंदाज श्रेयस अय्यरने आणखी एक यू-टर्न घेतला आहे. श्रेयस अय्यर आता रणजी ट्रॉफीच्या सेमीफायनल मॅचमध्ये मुंबईकडून खेळताना दिसणार आहे. श्रेयस अय्यरने उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी स्वत:ला उपलब्ध घोषित केल्याची माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनने दिली आहे. 

मात्र, याआधी श्रेयस अय्यरने उपांत्यपूर्व फेरीसाठी अनफिट असल्याचे सांगितले होते. मात्र, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (NCA) अय्यर खेळण्यासाठी पुर्णपणे तंदुरुस्त असल्याचा रिपोर्ट दिला होता. यानंतर श्रेयस अय्यर खोटं बोलल्याचे समोर आले.

रणजी ट्रॉफीचे सेमी फायनल सामने २ मार्चपासून सुरू होणार आहेत. यात मुंबईचा सामना तामिळनाडूशी होणार आहे. "श्रेयस अय्यरने मुंबई क्रिकेट असोसिएशनला कळवले आहे की तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि तो उपांत्य फेरीचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल."

यापूर्वी श्रेयस अय्यरला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियात स्थान मिळाले होते. पण अय्यरला दोन कसोटीत काहीच करता आले नाही. अय्यरने पहिल्या दोन कसोटीत ३५, १३, २७ आणि २९ धावा केल्या. यानंतर अय्यरला संघातून वगळण्यात आले. 

यानंतर श्रेयस अय्यरला दुखापत झाल्याचे वृत्त समोर आले होते, पण बीसीसीआयने आपल्या निवेदनात दुखापतीचा उल्लेख कुठेच केलेला नव्हता. यावरून अय्यरला खराब कामगिरीच्या आधारावर संघातून वगळल्याचे स्पष्ट झाले.

तसेच, टीम इंडियातून बाहेर पडल्यानंतर अय्यरने रणजी क्रिकेट खेळावे, अशी मॅनेजमेंटची इच्छा होती. पण अय्यरने रणजी क्रिकेटकडे दुर्लक्ष केले. यानंतर बीसीसीआयने कडक पावले उचलत, टीम इंडियातून बाहेर असलेल्या खेळाडूंना रणजी खेळणे अनिवार्य केले. रणजी क्रिकेट खेळल्यानंतरच आयपीएल खेळण्याची परवानगी देण्यात येईल, असा नियम बीसीसीआयने बनवला आहे.

सोबतच, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानेही कसोटी क्रिकेटला गांभीर्याने न घेणाऱ्या खेळाडूंना भविष्यात स्थान मिळणार नाही, असा इशारा दिला आहे. बीसीसीआय आणि रोहित शर्मा यांचे हे रूप पाहून अय्यरने रणजी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला, असे म्हणता येईल.

सेमी फायनलसाठी मुंबईचा संघ पुढीलप्रमाणे: अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, भूपेन लालवाणी, अमोघ भटकळ, मुशीर खान, प्रसाद पवार, हार्दिक तामोरे, शार्दुल ठाकूर, शम्स मुलाणी, तनुष कोटियन, आदित्य धुमाळ, तुषार देशपांडे, मोहित अय्यर, ए. डायस आणि धवल कुलकर्णी.