mumbai vs tamilnadu, ranji trophy semi final : रणजी ट्रॉफीचा दुसरा उपांत्य सामना मुंबई आणि तामिळनाडू यांच्यात खेळला जात आहे. श्रेयस अय्यरही या सामन्यात मुंबईकडून खेळत आहे. सर्वांच्या नजरा त्याच्या कामगिरीवर खिळल्या होत्या, पण तो काही खास करू शकला नाही आणि अवघ्या ३ धावा करून बाद झाला.
विशेष म्हणजे, श्रेयसला BCCI ने २०२३-२४ च्या खेळाडूंच्या वार्षिक करार यादीतून वगळले आहे. यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा होत्या.
मुंबई विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्याच्या पहिल्या दिवशी तामिळनाडूचा संघ पहिल्या डावात अवघ्या १४६ धावांवर गारद झाला. यानंतर (२ मार्च) दिवसाचा खेळ संपेपर्यंत मुंबई संघाने २ गडी गमावून ४५ धावा केल्या होत्या, तर आज(३ मार्च) दुसऱ्या दिवशी तामिळनाडूने पहिल्या सत्रात उत्कृष्ट गोलंदाजी करत मुंबईचे ४ गडी बाद केले. मुंबईने ९१ धावांपर्यंत मजल मारली होती.
यानंतर फलंदाजीला आलेल्या श्रेयस अय्यरकडून सगळ्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र ३ धावा करून तो बाद झाला. संदीप वारियरने एका शानदार चेंडूवर अय्यरला झेलबाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी श्रेयसने या सामन्यात चांगली कामगिरी करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात होते, त्यानंतर आता या सामन्यात मुंबई संघाच्या दुसऱ्या डावात तो कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
श्रेयस बाद झाला तेव्हा मुंबईच्या ७ बाद १०६ धावा झाल्या होत्या. मुशीर खानने निश्चितपणे संघासाठी ५५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यामुळे मुंबईचा संघ १०० धावांचा टप्पा पार करण्यात यशस्वी ठरला. तामिळनाडूकडून आर साई किशोरने आतापर्यंत ५ विकेट्स घेतल्या आहेत.
संबंधित बातम्या