मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Asia Cup 2023 : केएल राहुल-श्रेयसचं पुनरागमन, आशिया चषकातून या दोन खेळाडूंचा पत्ता कट होणार?

Asia Cup 2023 : केएल राहुल-श्रेयसचं पुनरागमन, आशिया चषकातून या दोन खेळाडूंचा पत्ता कट होणार?

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 19, 2023 01:03 PM IST

Shreyas Iyer Kl Rahul Comeback : आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषकापूर्वी टीम इंडियाचे दोन फलंदाज श्रेयस अय्यर आणि केएल राहुल पुनरागमनासाठी सज्ज आहेत. दोन्ही खेळाडू एनसीएमध्ये कसून सराव करत आहेत.

Shreyas Iyer Kl Rahul
Shreyas Iyer Kl Rahul

आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषक 2023 साठी भारतीय क्रिकेट संघाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. आशिया कपसाठी संघाची निवड काही दिवसांत होणार आहे. आशिया चषकासाठी संघाच्या निवडीबरोबरच विश्वचषक स्पर्धेसाठीचा संभाव्य संघही जवळपास निश्चित होणार आहे. अशा परिस्थितीत, पुढील काळ निवडकर्त्यांसाठी खूप आव्हानात्मक असणार आहे, कारण दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करण्यासाठी अनेक खेळाडू तयार आहेत. या खेळाडूंमध्ये केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांची नावे आघाडीवर आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

केएल राहुल राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये परिस्थितीनुसार सराव करताना दिसला आहे. यादरम्यान राहुलने बराच वेळ फलंदाजी आणि यष्टीरक्षणाचा सराव केला. अशा स्थितीत आशिया चषकात राहुलची निवड जवळपास निश्चित आहे. त्याचबरोबर श्रेयस अय्यरही दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे. अय्यरही एनसीएमध्ये असून त्याने फलंदाजीचाही भरपूर सराव केला.

अशा परिस्थितीत आता एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की केएल राहुल आणि श्रेयस अय्यर संघात परतल्यानंतर त्यांच्या जागी कोणत्या खेळाडूंना डच्चू मिळेल? 

संजू आणि सुर्या संघाबाहेर जाणार?

केएल राहुल आणि श्रेयस अय्यरच्या जागी संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव यांचा चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, या दोन्ही फलंदाजांनी म्हणावी तशी कामगिरी केली नाही. संजू सॅमसनला टीम इंडियात आतापर्यंत एकूण १३ एकदिवसीय सामने खेळण्याची संधी मिळाली आहे, ज्यामध्ये तो १०४ च्या स्ट्राइक रेटने ३९० धावा करू शकला आणि केवळ तीन वेळा ५० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. 

दुसरीकडे सूर्यकुमार यादवच्या यादवबद्दल बोलायचे झाले तर, वनडे फॉरमॅटमध्ये त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. सूर्यकुमार यादवला यावर्षी टीम इंडियासाठी एकूण १० वनडे खेळण्याची संधी मिळाली आहे. या १० सामन्यांमध्ये त्याची सरासरी केवळ १४ इतकी आहे, ज्यामध्ये तो केवळ १२७ धावा करू शकला आहे. सूर्यकुमार यादवचा एकदिवसीय क्रिकेटमधील रेकॉर्ड पाहता त्याचे संघातील स्थान कोठूनही दिसत नाही.

अशा स्थितीत अय्यर आणि राहुलचे पुनरागमन होताच सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन वनडे संघातून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

मधल्या फळीत अय्यर आणि राहुलचा रेकॉर्ड 

श्रेयस अय्यर आणि केएल राहुलचा मधल्या फळीत चांगला रेकॉर्ड आहे. विशेषत: चौथ्या क्रमांकावर असलेल्या श्रेयस अय्यरचे फलंदाजीचे आकडे बाकीच्यांपेक्षा खूपच चांगले आहेत. त्याने या स्थानावर टीम इंडियासाठी एकूण २० सामन्यांमध्ये फलंदाजी केली आहे, ज्यामध्ये त्याने ४७.३३ च्या सरासरीने ८०५ धावा केल्या आहेत. यात ५ अर्धशतके आणि १ शतकाचाही समावेश आहे.

दुसरीकडे, केएल राहुलबद्दल बोलायचे झाले तर पाचव्या क्रमांकावर त्याचा फलंदाजीचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. या स्थानावर, राहुलने टीम इंडियासाठी एकूण १८ सामने खेळले आहेत, ज्यात त्याने ५३ च्या सरासरीने ७४२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ७ अर्धशतकेही झळकावली.

WhatsApp channel
Cricket News मधील सर्व ताज्या घडामोडी Live Score सह Marathi News आणि प्रत्येक सामन्यागणिक बदलणारा पाहा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर