बुची बाबू क्रिकेट टुर्नामेंटमध्ये सर्वांच्या नजरा श्रेयस अय्यर, सरफराज खान आणि सूर्यकुमार यादव यांच्यावर आहेत. याचे कारण म्हणजे सप्टेंबरमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात २ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे, ज्यासाठी टीम इंडियाची घोषणा होणे बाकी आहे.
दरम्यान, या स्पर्धेतील सामन्याच्या दोन्ही डावात श्रेयस अय्यर फ्लॉप ठरला आहे, तर सरफराज खानला खातेही उघडता आले नाही. आता मुंबई संघावर पराभवाचे सावट आहे.
बुची बाबू ट्रॉफीत तामिळानाडू आणि मुंबई यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या डावात श्रेयर अय्यर दोन धावा करून बाद झाला होता. तर कर्णधार सर्फराज केवळ ६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
दुसऱ्या डावातही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. श्रेयस अय्यरला ७९ चेंडूत केवळ २२ धावा करता आल्या. तर कर्णधार सर्फराज खान ४ चेंडू खेळून शून्यावर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होईल, असे मानले जात आहे. मालिकेतील पहिला सामना १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
अशा परिस्थितीत बीसीसीआयची निवड समितीही या सर्व खेळाडूंवर लक्ष ठेवून आहे. मात्र, दुलीप ट्रॉफीचे आयोजन अद्याप व्हायचे आहे. दुलीप ट्रॉफी ५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. पहिल्या सामन्यानंतरच टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे. दुलीप ट्रॉफी सामन्यातील कामगिरीच्या आधारे संघ निवडला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत या सर्वांना निवडकर्त्यांना प्रभावित करण्याची आणखी एक संधी आहे.
मुंबई संघ सध्या तामिळनाडूविरुद्ध अडचणीत सापडला आहे. मुंबईला सामना जिंकण्यासाठी अजूनही सुमारे ४०० धावा करायच्या आहेत आणि ५ विकेट पडल्या आहेत. बुची बाबू स्पर्धेचा सामना ४ दिवस चालेल, म्हणजे आज शेवटचा दिवस आहे. उरलेल्या वेळेत मुंबईच्या ५ विकेट्स काढण्याचा तमिळनाडू पुरेपूर प्रयत्न करेल. मात्र, सूर्यकुमार यादव अद्याप फलंदाजीला आलेला नाही. त्याच्यावर संघाची मोठी जबाबदारी असेल.