देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा विजय हजारे ट्रॉफीचा थरार सुरू झाला आहे. पहिल्या दिवसाच्या लढतीत मुंबईचा कर्णधार श्रेयस अय्यर याने आपल्या तुफानी फलंदाजीने खळबळ उडवून दिली. अय्यरने कर्नाटकविरुद्ध दमदार फलंदाजी करत अवघ्या ५० चेंडूत आपले शतक पूर्ण केले.
मुंबईसाठी ११४ धावांची खेळी करून अय्यर नाबाद राहिला. या खेळीत त्याने ५५ चेंडूंचा सामना केला आणि १० षटकार आणि ५ चौकार मारले.
श्रेयस अय्यरच्या दमदार फलंदाजीमुळे मुंबईने कर्नाटकविरुद्धच्या निर्धारित ५० षटकांच्या सामन्यात ४ गडी गमावून ३८४ धावा केल्या. या देशांतर्गत हंगामात श्रेयस अय्यर सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. अशा परिस्थितीत अय्यर लवकरच टीम इंडियात पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे.
कर्नाटकविरुद्ध श्रेयस अय्यरच्याच बॅटने नव्हे, तर आयुष म्हात्रे, हार्दिक तामोरे आणि शिवम दुबे यांनीही मुंबईसाठी चांगलाच धुमाकूळ घातला. संघाकडून आयुष म्हात्रेने ८२ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७२ धावांची खेळी केली.
यानंतर हार्दिकने मुंबईसाठी ९४ चेंडूत ८४ धावा केल्या. याशिवाय शिवम दुबे ३६ चेंडूत ६३ धावा करून नाबाद राहिला. शिवम दुबेनेही आपल्या खेळीत ५ षटकार आणि ५ चौकार लगावले.
कर्नाटकाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली. विद्याधर पाटीलने १० षटकांच्या स्पेलमध्ये १०३ धावा दिल्या ज्यात फक्त एक विकेट घेतली. याशिवाय प्रवीण दुबेने १० षटकांत ८९ धावा दिल्या. श्रेयस गोपालनेही ६५ धावा दिल्या.
कर्नाटक (प्लेइंग इलेव्हन): मयंक अग्रवाल (कर्णधार), अनिश केव्ही, निकिन जोस, स्मरण रविचंद्रन, अभिनव मनोहर, कृष्णन श्रीजीथ (विकेटकीपर), श्रेयस गोपाल, विजयकुमार विशक, प्रवीण दुबे, वासुकी कौशिक, विद्याधर पाटील.
मुंबई (प्लेइंग इलेव्हन) : अंगक्रीश रघुवंशी, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर (कर्णधार), सूर्यकुमार यादव, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, अथर्व अंकोलेकर, शार्दुल ठाकूर, एम जुनेद खान, तनुष कोटियन.
संबंधित बातम्या