आयपीएल फ्रँचायझी पंजाब किंग्जने अनुभवी फलंदाज श्रेयस अय्यर याला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला आहे. बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याने रविवारी रिॲलिटी टीव्ही शो 'बिग बॉस'मध्ये याची घोषणा केली.
चाहत्यांसाठी हा खूपच रोमहर्षक क्षण होता. शोच्या सेटवर सलमानसोबत श्रेयस अय्यर, शशांक सिंग आणि युझवेंद्र चहल हे पंजाब किंग्सचे खेळाडू उपस्थित होते.
डिसेंबर २०२४ मध्ये झालेल्या आयपीएल लिलावात फ्रँचायझीने २६ कोटी ७५ लाख रुपयांना विकत घेतले होते. या जबाबदारीनंतर अय्यरने पंजाब किंग्ज व्यवस्थापनाचे आभार मानले आहेत.
श्रेयस अय्यरने २०२४ या वर्षात धमाकेदार कामगिरी केली आहे. त्याने आधी २०२४ च्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन बनवले. यानंतर डोमेस्टीक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली. अय्यर रणजी आणि इराणी ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई संघाचा भाग होता. यानंतर त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने दुसरी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली.
कर्णधार झाल्यानंतर श्रेयस अय्यर म्हणाला, 'संघाने माझ्यावर विश्वास व्यक्त केला याचा मला सन्मान वाटतो. मी पुन्हा प्रशिक्षक पाँटिंगसोबत काम करण्यास उत्सुक आहे. क्षमता असलेल्या आणि चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे उत्तम मिश्रण असलेला संघ मजबूत दिसत आहे. मला आशा आहे की व्यवस्थापनाने दाखवलेल्या विश्वासाची परतफेड संघाला पहिले विजेतेपद मिळवून देऊन करू शकू."
मुख्य प्रशिक्षक रिकी पॉंटिंग म्हणाला, 'कर्णधार म्हणून त्याच्या सिद्ध क्षमतेमुळे संघाला चांगली कामगिरी करता येईल. आयपीएलमध्ये याआधी मी अय्यरसोबत वेळ घालवला आहे आणि मी त्याच्यासोबत पुन्हा काम करण्यास उत्सुक आहे. त्याचे नेतृत्व आणि संघातील प्रतिभा पाहता आगामी मोसमासाठी मी उत्सुक आहे.
संबंधित बातम्या