मुंबई आणि जम्मू-काश्मीर यांच्यात रणजी ट्रॉफीचा सामना सुरू आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मैदानावर जोरदार नाट्य पाहायला मिळाले. मुंबईच्या दुसऱ्या डावात श्रेयस अय्यरच्या झेलवरून वाद झाला. अय्यर १७ धावांवर फलंदाजी करत असताना हा प्रकार घडला.
वास्तविक, गोलंदाज आकिब नबी याने अय्यरच्या विरोधात झेलबादचे अपील केले. यानंतर पंच एस रवी यांनी बाद अय्यरला बाद घोषित केले. अशा स्थितीत श्रेयस अय्यर चांगलाच संतापला आणि पॅव्हेलियनमध्ये परतण्याऐवजी मैदानावरच पंचांशी वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर नॉन स्ट्राईकवर असलेला कर्णधार अजिंक्य रहाणे यानेही पंचांच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. पण निर्णय बदलला नाही आणि अय्यर यांना परतावे लागले.
जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबीचा चेंडू श्रेयस अय्यरच्या बॅटला लागून विकेटकीपर कन्हैया वाधवनकडे गेला. त्याने डाइव्ह मारून झेल पकडला. पण हा झेल योग्य पद्धतीने घेतला गेला नाही, असे अय्यरचे मत होते.
त्यामुळे पंचांनी आऊट दिल्यानंतरही तो तंबूत जायला तयार नव्हता. त्यानंतर रहाणेला या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. त्याने आपली नाराजी देखील व्यक्त केली आणि मैदानावरील पंच एस रवी यांच्याशी या झेलबद्दल चर्चा केली.
मात्र प्रदीर्घ चर्चा होऊनही पंच त्यांचे म्हणणे मान्य करण्यास तयार नव्हते आणि त्यांनी आपला निर्णय कायम ठेवला. यानंतर अय्यर रागाने ड्रेसिंग रूमकडे निघाला.
याआधीही जम्मू-काश्मीर आणि मुंबई यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सामन्यात Psn घेण्यावरून वाद झाला होता. त्यावेळीही फलंदाज अय्यर आणि पंच एस रवी हेच होते. खरे तर दुसऱ्या डावात अय्यर ८ धावा करून फलंदाजी करत असताना यष्टीरक्षकाने त्याच्याविरुद्ध झेलचे अपील केले होते. गोलंदाजांसह जम्मू-काश्मीरच्या खेळाडूंना एज लागल्याची खात्री होती. मात्र जोरदार अपील करूनही पंचांनी आऊट दिले नाही. यानंतर खेळाडू चांगलेच संतापलेले दिसले.
सामन्याच्या दुसऱ्या डावातही मुंबई संघातील स्टार फलंदाजांनी फ्लॉप शो दाखवला. दुसऱ्या डावात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा केवळ २८ धावा करून बाद झाला. यशस्वी जैस्वालने २६, कर्णधार अजिंक्य रहाणेने १६ आणि शिवम दुबे शुन्यावर पॅव्हेलियनमध्ये परतले. पहिल्या डावात रोहितने ३ धावा, यशस्वीने ४ धावा, रहाणेने १२ धावा, अय्यरने ११ धावा केल्या तर शिवम दुबे शुन्यावर बाद झाला.
संबंधित बातम्या