कसोटी सामना ५ दिवस खेळला जातो. पण कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एक असाही सामना झाला आहे, जो केवळ ५६ मिनिटातच संपवण्यात आला होता. हा सामना इंग्लंड आणि वेस्ट इंडीज (ENG vs WI) यांच्यात खेळला गेला.
इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी सामना केवळ ५६ मिनिटेच चालू शकला. कारण खेळपट्टी खूपच धोकादायक होती. या पीचमुळे खेळाडूंना फलंदाजी करणे कठीण जात होते. तसेच, चेंडूच्या अनपेक्षिक बाउन्समुळे खेळाडूंना दुखापती होण्याचा धोका होता.
हा सामना जमैकाच्या किंग्स्टन येथील सबिना पार्क येथे खेळला गेला. २९ जानेवारी १९९८ ला सुरु झालेल्या या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार माईक आथर्टन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी वेस्ट इंडिजकडे कोर्टनी वॉल्श आणि कर्टली ॲम्ब्रोससारखे धोकादायक वेगवान गोलंदाज होते. कर्णधार ब्रायन लारा याने सुरुवातीलाच दोघांकडे गोलंदाजीची कमान दिली.
या पीचवर कोर्टनी वॉल्श आणि कर्टली ॲम्ब्रोस यांनी आपल्या वेगवान गोलंदाजीने इंग्लंडच्या टॉप ऑर्डरला अडचणीत आणले. या गोलंदाजांना खेळपट्टीची खूप मदत मिळत होती. खेळपट्टीवर मोठ्या भेगा पडल्या होत्या, ज्यावर चेंडू पडत होता आणि इंग्लंडच्या फलंदाजांच्या संपूर्ण शरीराला लक्ष्य करत होता.
परिणामी फिजिओला वारंवार मैदानात जावे लागत होते. खेळाच्या पहिल्या ५६ मिनिटांत, इंग्लंडच्या फिजिओला आपल्या खेळाडूंच्या दुखापती दूर करण्यासाठी ६ वेळा मैदानावर यावे लागले.
या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांना पहिल्या ४४ चेंडूत केवळ ९ धावा करता आल्या आणि तीन विकेट पडल्या. कसे तरी, पुढील १७ चेंडू टाकले गेले आणि नंतर पंचांना सामना ड्रॉ करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
खरं तर, सामन्याच्या ११व्या षटकाच्या पहिल्या चेंडूनंतर इंग्लंडचा कर्णधार माईक आथर्टन पंचांकडे गेला आणि खेळपट्टीबद्दल तक्रार केली. यानंतर पंचांनी सामना ड्रॉ करण्याचा निर्णय घेतला. सामना अनिर्णित राहिला तोपर्यंत इंग्लंड संघाने १०.१ षटकांत ३ गडी गमावून १७ धावा केल्या होत्या.
संबंधित बातम्या