भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून (२ फेब्रुवारी) विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडने रोहित सेनेचा २८ धावांनी पराभव करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती. त्यामुळे हा सामना टीम इंडियासाठी महत्वाचा आहे.
विशाखापट्टणममध्ये रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर टीम इंडियाच्या सलामीवीरांनी सावध सुरुवात केली. पण कर्णधार आणइ सलामीवीर रोहित शर्माला चांगल्या सुरुवातीचे रुपांतर मोठ्या डावात करता आले नाही.
रोहित शर्माला पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या २० वर्षांच्या नवख्या शोएब बशीरने बाद केले. रोहित वाईट फटका खेळून बाद झाला. त्याने ४१ चेंडूत १४ धावा केल्या. लाजिरवाणी बाब म्हणजे हिटमॅनला या खेळीत एकही चौकार मारता आला नाही.
रोहित शर्माच्या विकेट काढल्यानंतर पाकिस्तानी वंशाच्या शोएब बशीरचे सर्व इंग्लिश खेळाडूंनी अभिनंदन केले. बशीरनेही रोहितची विकेट काढल्यानंतर जंगी सेलिब्रेशन केले.
शोएब बशीर आणि रोहित शर्माडावाच्या १४व्या षटकात आमनेसामने आले. रोहितने पहिला चेंडू डॉट खेळला, तर दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. यानंतर, दोघे १६व्या षटकातील ६व्या चेंडूवर दोघे पुन्हा आमनेसामने आले. रोहितने पुन्हा चेंडू खेळून काढला.
यानंतर बशीरने १८व्या षटकात रोहित शर्माला तीन चेंडू टाकले. या षटकाच्या तिसरा चेंडू बशीरने हवेत सोडला. या फिरणाऱ्या चेंडूवर हिटमॅनने चूक केली. रोहितने चेंडू लेग साइडची दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला पण चेंडू बॅटला लागून लेग स्लीपमध्ये उभ्या असलेल्या ओली पोपच्या हातात गेला आणि बशीरसह इंग्लंडच्या सर्व खेळाडूंनी जल्लोष केला.
भारताची प्लेइंग इलेव्हन - यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, श्रीकर भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार, कुलदीप यादव.
इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन - जॅक क्रोली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर, जेम्स अँडरसन.
संबंधित बातम्या