मालिकेतील पहिल्या म्हणजेच हैदराबाद कसोटीत भारत आणि इंग्लिश संघाच्या फिरकीपटूंची जादू पाहायला मिळाली होती. विशेष म्हणजे भारतीय फलंदाज इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांसमोर संघर्ष करताना दिसत होते. अशातच आणखी एक फिरकी गोलंदाजाची इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री झाली आहे.
शोएब बशीर असे फिरकी गोलंदाजाचे नाव असून याआधीच शोएब बशीरची बरीच चर्चा भारतात झाली आहे. कारण व्हिसा, पाकिस्तानी वंश या प्रकरणांमुळे शोएब बशीर भारतीयांना आधीच ठाऊक झाला आहे.
या सर्व अडचणीनंतर अखेर आता शोएब बशीर इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दाखल झाला आहे. २० वर्षांचा शोएब बशीर ऑफस्पिनर आहे. त्याला हैदराबाद कसोटीत व्हिसा न मिळाल्याने खेळता आले नव्हते. पण आता शोएब बशीर भारतात पोहोचला असून पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.
भारताविरुद्ध पदार्पण करण्यास तयार असलेला बशीर बेन स्टोक्सची शोध असल्याचे सांगितले जात आहे. स्टोक्सने सोशल मीडियावर शोएबचा गोलंदाजीचा व्हिडीओ पाहिला होता. त्यानंतर त्याला भारताविरुद्ध मैदानात उतरवण्याचा निर्णय स्टोक्सने घेतला.
२० वर्षीय शोएब बशीरने आतापर्यंत प्रोफेशनल क्रिकेटमध्ये सर्व मिळून केवळ १८ सामने खेळले आहेत. ६ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याने ३.३० च्या इकॉनॉमी रेटने १० विकेट घेतल्या आहेत.
शोएब बशीरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कूक याच्याविरुद्ध प्रभावी गोलंदाजी केली होती. यानंतर शोएब बशीर आपल्या ऑफस्पिनने भारताविरुद्ध चमत्कार करेल असे स्टोक्सला वाटले. त्यावेळी स्टोक्सने बशीरची व्हिडीओ क्लिप संघाचे मॅनेजिंग डायरेक्टर रॉब आणि मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांना पाठवली. यानंतर त्याची या मालिकेसाठी निवड झाली.
दरम्यान, शोएब बशीर जशी गोलंदाजी करतो, ते पाहता तो आशियाई खेळपट्ट्यांवर भरपूर विकेट घेऊ शकतो. तो चेंडूला खूप हवा देतो. दुसरे म्हणजे, तो भारतात पूर्णपणे नवीन आहे. अज्ञात फिरकीपटूंविरुद्ध भारतीय फलंदाजीतील कमकुवतपणा सर्वश्रुत आहे. यापूर्वी अजंथा मेंडिस, वानिंदू हसरंगा अशा नवख्या फिरकी गोलंदाजांनी भारताला त्रास दिला आहे.
संबंधित बातम्या