कॅरिबियन प्रीमियर लीगच्या (CPL 2024) ७व्या सामन्यात सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्स आणि गयाना ॲमेझॉन वॉरियर्स हे संघ आमनेसामने होते. या सामन्यात शिमरॉन हेटमायरच्या झंझावाती खेळीच्या बळावर गयाना ॲमेझॉन वॉरियर्सने सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्सचा ४० धावांनी पराभव केला.
हेटमायरने या सामन्यात ९१ धावांची वादळी खेळी खेळली आणि टी-20 क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला.
वास्तविक, गयानाचा कर्णधार इम्रान ताहिरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज आणि केविन सिंक्लेअर यांनी डावाला सुरुवात केली पण २५ धावांच्या आतच काईल मेयर्सने सलामीची जोडी फोडली.
तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर केविन सिंक्लेअरच्या (१७) रूपाने संघाला पहिला धक्का बसला. यानंतर मैदानात आलेला शाय होपही (१२) स्वस्तात बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. वीरसामी परमौलने होपची शिकार केली.
संघाने लवकर २ विकेट गमावल्यानंतर, शिमरॉन हेटमायरने गुरबाजसह संघाटा डाव सावरला. हेटमायरने अवघ्या ३९ चेंडूत ९१ धावांची शानदार खेळी करत एक नवा विक्रम रचला. त्याने आपल्या झंझावाती खेळीत ११ गगनचुंबी षटकार ठोकले.
हेटमायरने २३३.३३ च्या स्ट्राइक रेटने ९१ धावांची खेळी खेळली, ज्यामध्ये त्याने ११ षटकार मारले. परंतु या डावात हेटमायरने एकही चौकार मारला नाही.
अशाप्रकारे, तो T20 क्रिकेटच्या इतिहासात एकही चौकार न मारता १० किंवा अधिक षटकार मारणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. याआधी इतर कोणत्याही फलंदाजाला अशी कामगिरी करता आली नव्हती.
गयाना ॲमेझॉन वॉरियर्सच्या २६६/७ धावसंख्येला प्रत्युत्तर देताना सेंट किट्सचा संघ १८ षटकांत २२६ धावांत सर्वबाद झाला. विशेष म्हणजे, या सामन्यात दोन्ही संघांनी एकूण ४२ षटकार ठोकले, जे टी-20 सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा संयुक्त विक्रम आहे.
यापूर्वी आयपीएल २०२४ मध्ये कोलकाता आणि पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यातही ४२ षटकारांचा पाऊस पडला होता.