Shikhar Dhawan NPL Score : भारताचा माजी सलामीवीर शिखर धवन सध्या नेपाळ प्रीमियर लीगमध्ये (एनपीएल) खेळत आहे. शिखर धवन एनपीएलमधील कर्नाली याक्स संघाचा भाग आहे. एनपीएलच्या पहिल्या सामन्यात धवन अवघ्या १४ धावांवर बाद झाला, पण दुसऱ्या सामन्यात त्याची गब्बर स्टाईल पाहायला मिळाली. शिखर धवनने काठमांडू गुरखाविरुद्ध खेळलेल्या सामन्यात षट्कार आणि चौकार ठोकले. यासोबतच त्याने ७२ धावांची नाबाद खेळी केली. मात्र, धवनच्या दमदार खेळीनंतर देखील त्याचा संघ जिंकू शकला नाही.
शिखर धवनच्या खेळीमुळे प्रथम फलंदाजीला आलेल्या कर्नाली याक्सने दुसऱ्या सामन्यात २० षटकात ५ गडी गमावून १४९ धावा केल्या. धवनने केलेल्या ७२ धावा व्यतिरिक्त, संघाच्या इतर कोणत्याही फलंदाजाला २५ धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. धवन सुरुवातीपासून शेवटपर्यंत विकेटवर राहिला. त्याने आपल्या डावाची सुरुवात संथपणे केली. पण, एकदा गेम निश्चित झाल्यावर त्याने काठमांडू गोरखाजच्या गोलंदाजांना चांगलेच फटके दाखवले.
शिखर धवन हा संपूर्ण सामन्यातील सर्वोत्तम धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने ५१ चेंडूत १४१.१७ च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या आणि या दरम्यान चार चौकार आणि पाच षटकार ठोकले. एनपीएलमध्ये भाग घेण्यापूर्वी शिखर धवन काही काळ स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर राहिला होता.
एनपीएलमध्ये भाग घेण्यापूर्वी शिखर धवन याने यावर्षी ९ एप्रिल रोजी ‘पंजाब किंग्ज’कडून शेवटचा सामना खेळला होता. आयपीएल २०२४मध्ये शिखर धवन केवळ ५ सामने खेळू शकला होता आणि त्यानंतर त्याला दुखापतीमुळे बाहेर बसावे लागले होते. शिखर धवनने भारताकडून एकूण ३४ कसोटी, १६७ वनडे आणि ६८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. धवनने तिन्ही फॉरमॅटमध्ये अनुक्रमे २३१५, ६७९३ आणि १७५९ धावा केल्या आहेत.
शिखर धवनच्या खात्यात सात कसोटी आणि १७ एकदिवसीय शतके आहेत. शिखर आणि रोहितने टीम इंडियासाठी अनेक सामन्यांमध्ये खेळाच्या डावाची सुरुवात केली आहे. शिखर धवनने आयपीएलमध्ये दोन शतके झळकावली आहेत. इतकेच नव्हे तर, आयपीएलमध्ये सलग शतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. शिखर धवन आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद, डेक्कन चार्जर्स आणि मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम शिखर धवनच्या नावावर आहे.
संबंधित बातम्या