mithali raj in dhawan karenge show : भारताचा अनुभवी फलंदाज शिखर धवनने स्वत:बद्दल एक रोचक खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, एकदा भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज आणि त्याच्या लग्नाच्या अफवा पसरल्या होत्या.
मिताली राज ही भारताची दिग्गज महिला क्रिकेटपटूंपैकी एक आहे. मिताली महिलांच्या वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. मितालीने शेवटचा आंतरराष्ट्री सामना २०२२ च्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता.
सध्या मिताली राज महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये गुजरात जायंट्सची मार्गदर्शक आहे. दुसरीकडे, धवन अलीकडेच IPL २०२४ मध्ये PBKS (पंजाब किंग्स) कडून खेळला. शिखरने जिओ सिनेमाचा शो 'धवन करेंगे' मध्ये मिताली आणि त्याच्या नात्याबाबतच्या अफवांबाबत खुलासा केला.
धवन म्हणाला, 'मी ऐकले होते की मी मिताली राजसोबत लग्न करणार आहे.' हे ऐकून दोघेही हसायला लागतात. मिताली राज धवनच्या शोमध्ये पाहुणी म्हणून आली होती. यादरम्यान शिखरने मितालीला क्रिकेट आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक प्रश्न विचारले.
शिखर धवनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे तर त्याने भारतासाठी ३४ कसोटी, १६७ एकदिवसीय आणि ६८ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत २३१५ धावा आहेत ज्यात ७ शतके आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे.
याशिवाय त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ६७९३ आणि टी-20 मध्ये १७५९ धावा केल्या आहेत. धवनने वनडेमध्ये १७ शतके आणि ३९ अर्धशतके केली आहेत. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये त्याच्या नावावर ११ अर्धशतके आहेत. शिखर धवन २०१९ मध्ये टीम इंडियाच्या विश्वचषक संघाचा एक भाग होता आणि त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकही ठोकले होते पण त्यानंतर तो दुखापतीमुळे बाहेर पडला होता.
याशिवाय तो २०१५ विश्वचषक संघाचा आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघाचा एक भाग होता. पण आता गब्बर या नावाने ओळखला जाणारा हा दिग्गज खेळाडू टीम इंडियात क्वचितच पुनरागमन करू शकणार आहे.