Legends League Cricket 2024: टीम इंडियाचा माजी सलामीवीर शिखर धवनने काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर आता शिखर धवन लिजेंड्स लीग क्रिकेटच्या तिसऱ्या सत्रात खेळताना दिसणार आहे. शिखर धवनसह दिनेश कार्तिकही लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच खेळताना दिसतणार आहेत. दिनेश कार्तिकनेही आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली. आता लिजेंड्स लीग क्रिकेट २०२४ साठी सर्व संघांच्या कर्णधारांची नावेही समोर येत आहेत. शिखर धवनलाही संघाने कर्णधार बनवले आहे.
शिखर धवनचा लिजेंड्स लीग क्रिकेट २०२४ चा हा पहिला हंगाम आहे. पहिल्याच हंगामात त्याला कर्णधारपद देण्यात आले. गुजरात ग्रेट्सने धवनला आपल्या संघाचा कर्णधार बनवले आहे. धवनलाही कर्णधारपदाचा चांगला अनुभव आहे. तसेच जगातील आक्रमक फलंदाजांमध्ये शिखर धवनचेही नाव घेतले जाते.
शिखरने दीर्घकाळ आयपीएलमध्ये कर्णधार पद संभाळले आहे. आयपीएल २०१४ मध्ये धवन पंजाब किंग्जचा कर्णधार होता. पंरतु, दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर राहावे लागले. प्रथमच लिजेंड्स लीग क्रिकेट खेळणाऱ्या दिनेश कार्तिकला कर्णधारपद मिळाले आहे, तो साउदर्न सुपरस्टार्स संघाचे नेतृत्व करणार आहे.
५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये संघाचा महत्त्वाचा सदस्य असलेल्या धवनने ४४.११ च्या प्रभावी सरासरीने ६ हजार ७९३ धावा केल्या, ज्यात १७ शतके आणि ३९ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची कसोटी कारकीर्द अल्पकालीन होती, पण त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात १८५ धावांची खेळी कायम चाहत्यांच्या लक्षात राहील. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ४०.६१ च्या सरासरीने २ हजार ३१५ धावा केल्या आहेत, ज्यात सात शतकांचा समावेश आहे.
एलएलसी २०२४ सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे. लीजेंड्स लीग क्रिकेट सप्टेंबर २०२४ मध्ये आपला पुढील हंगाम सुरू करणार आहे, ज्यात निवृत्त क्रिकेटपटूंची लाइनअप रोमांचक सामन्यांच्या मालिकेत भाग घेत आहे. आयपीएलच्या गेल्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसंघाकडून शानदार कामगिरी केल्यानंतर कार्तिकचे कौशल्य पुन्हा एकदा मैदानावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक असल्याने कार्तिकच्या सहभागाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. एलएलसी लिलाव २९ ऑगस्ट २०२४ रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे, जिथे फ्रँचायझी भारत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मोठ्या स्टार्ससाठी लढतील, ज्यात २०० पेक्षा जास्त खेळाडूंचा समावेश असेल.