Mohammed Shami on Virat Kohli and Ravi Shastri: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी गेल्या अनेक महिन्यांपासून भारतीय क्रिकेट संघाबाहेर आहे. त्याने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात शेवटचा सामना खेळला. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात दुखापत झाल्याने शामी आयपीएल आणि टी-२० विश्वचषक खेळू शकला नाही. याचदरम्यान, एका शोमध्ये बोलताना मोहम्मद शामीने २०१९ च्या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध सामन्यातून वगळण्यात आल्याने नाराजी व्यक्त केली. शामीला या महत्त्वाच्या सामन्यातून वगळण्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि माजी मुख्यप्रशिक्षक रवी शास्त्री कारणीभूत आहेत, असा आरोप केला जात आहे.
'अनप्लग्ड' या यूट्यूब शोमध्ये शुभंकर मिश्रासोबत नुकत्याच झालेल्या संवादात शमीने चांगल्या विकेट्स घेतल्यानंतरही मैदानाबाहेर गायब असल्याचे सांगितले आहे. २०१९ च्या विश्वचषकात त्याला वगळल्याबद्दल त्याने विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्यावर अप्रत्यक्ष हल्ला चढवला आहे. विशेष म्हणजे २०१९ च्या विश्वचषकात टीम इंडियाचे नेतृत्व विराट कोहलीकडे होते तर रवी शास्त्री प्रशिक्षक होते.
आपले विचार व्यक्त करताना शमी मिश्राला म्हणाला, ‘मला एक गोष्ट वाटते की प्रत्येक संघाला अशा खेळाडूंची गरज असते जे चांगली कामगिरी करू शकतील. मी तीन सामन्यांत १३ बळी घेतले. तुला माझ्याकडून आणखी काय अपेक्षा आहे?’ मोहम्मद शामी पुढे म्हणाला की , ‘२०१९ मध्ये मी पहिले ४-५ सामने खेळलो नाही. पुढच्या सामन्यात मी हॅटट्रिक घेतली, त्यानंतर पाच विकेट्स घेतल्या आणि त्यानंतर पुढच्या सामन्यात चार विकेट्स घेतल्या. २०२३च्या विश्वचषकादरम्यान हीच गोष्ट त्याच्यासोबत घडली होती, "मी पहिल्या काही सामन्यांमध्ये खेळलो नाही आणि नंतर पाच, नंतर चार विकेट्स आणि नंतर पुन्हा पाच विकेट्स घेतल्या.’
‘मला एक गोष्ट सतत वाटते की, प्रत्येक संघाला अशा खेळाडूंची गरज असते जे चांगली कामगिरी करू शकतील. मी तीन सामन्यांत १३ बळी घेतले. तुला माझ्याकडून आणखी काय अपेक्षा आहे? माझ्याकडे ना प्रश्न आहेत ना उत्तरे. संधी मिळेल तेव्हाच मी स्वत:ला सिद्ध करू शकेन. तू मला संधी दिलीस आणि मी तीन सामन्यांत १३ विकेट्स घेतल्या. त्यानंतर आम्ही न्यूझीलंडकडून पराभूत झालो. मी एकूण चार सामने खेळलो आणि १४ विकेट्स घेतल्या. २०२३ मध्ये मी सात सामन्यांत २४ विकेट्स घेतल्या होत्या.’
आयसीसी विश्वचषक २०२३ मध्ये मोहम्मद शमीने एकट्याने जगातील धोकादायक फलंदाजी क्रम मोडीत काढत भारताला अंतिम फेरीत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान, यावर्षी शमीला अर्जुन पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. आपल्या दशकभराच्या कारकिर्दीत त्याने कसोटीत २२९, वनडेत १९५ आणि टी-२०मध्ये २४ बळी घेतले आहेत.
संबंधित बातम्या