टी-20 वर्ल्डकपवर नाव कोरल्यानंतर भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. २७ वर्षांनंतर टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका गमावली. श्रीलंकेने मालिका २-० ने जिंकली. सीनियर संघ खेळूनही भारताने मालिका गमावली, यामुळे प्रचंड टीका होता आहे.
भारत-श्रीलंका वनडे मालिकेत फिरकीपटूंनी टीम इंडियाला प्रचंड त्रास दिला. रोहित शर्मा असो की विराट कोहली, प्रत्येकजण फिरकीपटूंविरुद्ध संघर्ष करताना दिसला. मालिका गमावण्यामागे हेही एक मोठे कारण आहे. त्याचवेळी फिरकीपटूंसमोर नांगी टाकल्याने भारताच्या नावावर लज्जास्पद विक्रमही नोंदवला गेला. त्यावर एक नजर टाकूया.
श्रीलंका आणि भारत यांच्यात खेळल्या गेलेल्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम झाला आहे. वास्तविक, या मालिकेत श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी भारतीय संघाच्या २७ विकेट घेतल्या.
कमीतकमी ३ सामन्यांच्या द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेत कोणत्याही संघाने फिरकीपटूंविरुद्ध गमावलेल्या या सर्वाधिक विकेट आहे.
आता टीम इंडिया २०२४ मध्ये एकही वनडे सामना खेळणार नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षाच्या सुरुवातीला पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे. त्याआधी भारताची फिरकीपटूंविरुद्धची फलंदाजी ही चिंतेची सर्वात मोठी बाब ठरली आहे.
या मालिकेतील तीनही सामने कोलंबोतील आर प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर खेळले गेले. मालिकेतील पहिला सामना टाय झाला. विशेष म्हणजे हा सामना टीम इंडियाने जवळपास जिंकलेला होता, पण श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी अखेरच्या क्षणी सामना बरोबरीत सोडवला.
मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत भारताला २४१ धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, यानंतर श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी टीम इंडियाला पुन्हा अडचणीत आणले. यामुळे भारत २०८ धावांवर ऑलआऊट झाला आणि सामना ३२ धावांनी गमावला.
मालिकेतील शेवटच्या आणि तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेने रोहित सेनेला २४९ धावांचे लक्ष्य दिले होते. या सामन्यात भारतीय फलंदाजांची कामगिरी आणखीनच निराशाजनक होती. कारण अवघ्या २६.१ षटकात भारतीय क्रिकेट संघ १३८ धावांवर ऑलआऊट झाला आणि ११० धावांच्या मोठ्या फरकाने सामना गमावला.