नुकतीच ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली गेली. ही मालिका १-१ अशी बरोबरीत संपली. पण या मालिकेतून क्रिकेट जगताला नवा स्टार मिळाला आहे. शमार जोसेफ असे नव्या स्टारचे नाव असून त्याने आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले आहे.
२४ वर्षीय शमार जोसेफ ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज मालिकेचा मालिकावीर ठरला. जोसेफच्या तुफानी कामगिरीमुळेच वेस्ट इंडिजने तब्बल ३० वर्षांनंतर कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. शमार जोसेफने याच मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
दरम्यान, आता २४ वर्षांच्या शमार जोसेफची सर्वत्र चर्चा आहे. आता इंडियन प्रीमियर लीगमध्येही (IPL 2024) शमार जोसेफची मागणी होत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याला खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आरसीबीसोबत आणखी एक संघ शमार जोसेफच्या मागे आहे.
दुखापतग्रस्त गोलंदाज टॉम करनच्या जागी आरसीबी शमार जोसेफला विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे वृत्त समोर आले आहे.
शमार जोसेफ हा गाबा कसोटीत फलंदाजी करताना जखमी झाला होता. मिचेल स्टार्कच्या यॉर्करने त्याच्या पायाचा अंगठा तोडला होता. त्यामुळे तो फलंदाजीदरम्यान रिटायर हर्ट होऊन तंबूत परतला.
यानंतर त्याला दुसऱ्या डावात गोलंदाजी करता येईल की नाही यावर प्रश्नचिन्ह होते. पण सामन्याच्या चौथ्या दिवशी तो मैदानावर उतरला आणि शेवटचा फलंदाज जोवर बाद होत नाही तोपर्यंत गोलंदाजी केली.
शमार जोसेफने ऑस्ट्रेलियन फलंदाजांची फळी उद्ध्वस्त केली. जोसेफने केवळ २१ चेंडूत ३ ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बाद केले होते आणि यामुळे वेस्ट इंडिजने सामन्यात पुनरागमन केले.
जोसेफने एकट्याने ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीला तंबूत पाठवले. त्याने दुसऱ्या डावात एकूण ७ बळी घेतले. शमार जोसेफने कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांना बाद केले.
जोसेफने या कसोटी सामन्यात ८ विकेट घेतल्या. त्याने सलग ११ षटके टाकली आणि ७ बळी घेतले. यामुळे ऑस्ट्रेलियन संघाचा ८ धावांनी पराभव झाला. या मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी शमार जोसेफला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले. या दुखापतीमुळे शामर जोसेफ मैदानापासून दूर आहे. पण आयपीएल सुरू होईपर्यंत तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल.