Shamar Joseph vs Steve Smith : वेस्ट इंडिज क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना आज (१७ जानेवारी) बुधवारपासून अॅडलेडमध्ये खेळवला जात आहे.
या सामन्यात वेस्ट इंडिजचा पहिला डाव अवघ्या १८८ धावांत गारद झाला. १३३ धावात ९ विकेट पडल्यानंतर केमार रोच आणि युवा गोलंदाज शमार जोसेफ यांनी अखेरच्या विकेटसाठी ५५ धावांची भागिदारी केली.
११व्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या शमार जोसेफने ३६ धावांचे योगदान दिले. यानंतर शमार जोसेफेने गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली.
डेव्हिड वॉर्नरच्या निवृत्तीनंतर स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचा नवा सलामीवीर बनला आहे. पण सलामीवीर म्हणून त्याच्या पहिल्या सामन्यात फ्लॉप ठरला.
वेस्ट इंडिजकडून पदार्पणाचा सामना खेळणारा २५ वर्षायी वेगवान गोलंदाज शमार जोसेफने कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर स्टीव्ह स्मिथला बाद केले. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू स्मिथच्या बॅटची कड घेऊन तिसऱ्या स्लिपच्या हातात गेला. स्मिथने केवळ १२ धावा केल्या.
शमार जोसेफसाठी क्रिकेटर बनणे सोपे नव्हते. तो दोन मुलांचा बाप असून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी गार्डची नोकरी करायचा. पण त्याला लहानपणापासूनच क्रिकेटपटू व्हायचे होते.
क्रिकेटवर पूर्ण लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने एके दिवशी नोकरी सोडली. त्याचे व्यावसायिक क्रिकेटमध्ये पदार्पण वयाच्या २३ व्या वर्षी झाले. यानंतर आता वर्षभरातच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे.
शमार जोसेफ हा गयानामधील बारकारा नावाच्या गावात राहतो. बारकारा येथे जाण्यासाठी कांगे नदीवर सुमारे २२५ किमी बोटीतून प्रवास करावा लागतो. दाट झाडीमुळे प्रवासाला दोन दिवसदेखील लागू शकतात.
त्यांच्या गावात एकच प्राथमिक शाळा आहे. तेथे माध्यमिक शाळेचीही सोय नाही. २०१८ पर्यंत तेथे टेलिफोन आणि नेटवर्कचीही सुविधा नव्हती. या सर्व आव्हानांना न जुमानता शमार जोसेफ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पोहोचला आहे.
वेस्ट इंडिजचा पहिला डाव १८८ धावांवर आटोपल्यानंतर ऑस्ट्रेलियाने त्यांच्या पहिल्या डावात २ बाद ५९ धावा केल्या आहेत. पहिला दिवससंपेपर्यंत उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीन नाबाद होते.
तर वेस्ट इंडिजकडून आतापर्यंत शमार जोसेफने दोन विकेट घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलिया सध्या वेस्ट इंडिजपेक्षा १२९ धावांनी मागे आहे.
संबंधित बातम्या