पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (३१ ऑगस्ट) बांगलादेशचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसन याने पुन्हा एकदा आपली हुशारी दाखवली. शकिबच्या हुशारीच्या जाळ्यात बाबर आझम अडकला आणि पीचवरच कोसळला.
या मजेशीर प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बाबर आझम आणि यष्टीरक्षक लिटन दास हसताना दिसत आहेत.
ही घटना पाकिस्तानी डावाच्या ४८ व्या षटकात घडली, जेव्हा मोहम्मद रिझवानने सिंगल घेत बाबर आझमला स्ट्राइक दिली. यानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबरने शकीबच्या चेंडूवर पॅडल स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न. पण गोलंदाजी करताना शाकिबने अचानक थांबण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे बाबरचा तोल गेला आणि तो पीचवर पडला. बाबरची ही मजेशीर प्रतिक्रिया पाहून यष्टिरक्षक लिटन दासलाही हसू आवरता आले नाही.
दुसऱ्या कसोटीत बाबर आझमकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र शकिब अल हसनच्या गोलंदाजीवर तो पुन्हा एकदा अपयशी ठरला. पहिल्या कसोटीत फ्लॉप झाल्यानंतर बाबर आझमवर दबाव होता. त्याने सावधपणे फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, मात्र ३१ धावांवर शकीबच्या चेंडूवर तो एलबीडब्ल्यू आऊट झाला.
दुसऱ्या कसोटीत बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सॅम अयुब, शान मसूद आणि सलमान आगा यांनी अर्धशतके झळकावली. पाकिस्तान पहिल्या डावात २७४ धावांवर सर्वबाद झाला. यानंतर दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशने २ षटकांत बिनबाद १० धावा केल्या होत्या.