पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी सध्या चर्चेत आला आहे. त्याने पाकिस्तानी फलंदाजांच्या स्ट्राईक रेटबाबत चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानकडे शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, मोहम्मद अमीर आणि अब्बास आफ्रिदी यांसारख्या गोलंदाजांसह जगातील सर्वोत्तम वेगवान आक्रमण आहे. पण मला आपल्या फलंदाजांच्या स्ट्राइक रेटची सर्वाधिक चिंता आहे, असे आफ्रिदीने म्हटले आहे.
पाकिस्तानी क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर असून तिथे ते टी-20 मालिका खेळत आहे. मालिकेतील दुसरा सामना पाकिस्तानने गमावला. त्यानंतर आफ्रिदीने हे वक्तव्य केले आहे.
टी-20 विश्वचषक स्पर्धेचा राजदूत आफ्रिदीने सांगितले की, 'मला आमच्या फलंदाजांच्या स्ट्राईक रेटची चिंता आहे. विशेषत: ७व्या ते १३व्या षटकांदरम्यान. तो म्हणाला, 'आशा आहे की त्यात सुधारणा होईल. प्रत्येक षटकात ८ ते ९ धावा असाव्यात. माझ्या मते, पाकिस्तान जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे.' पाकिस्तानच्या २००९ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य असलेल्या आफ्रिदीला विश्वास आहे की वेगवान गोलंदाजांवर मोठी जबाबदारी असेल.
तो म्हणाला, 'मला वाटते की वेस्ट इंडिज आणि अमेरिकेची परिस्थिती आमच्या संघाला अनुकूल असल्याने पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचेल. इतर कोणत्याही संघाकडे इतके मजबूत गोलंदाजी आक्रमण नाही. आमचे वेगवान गोलंदाज अप्रतिम आहेत. या सर्व गोलंदाजांवर मोठी जबाबदारी आहे.
दरम्यान, गेल्या वेळी म्हणजेच, टी-20 वर्ल्डकप २०२२ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा इंग्लंडकडून ५ विकेट्सने पराभव झाला होता.
आफ्रिदी पुढे म्हणाला, 'संघातील सर्व खेळाडू महत्त्वाचे आहेत पण अलीकडच्या काळात बाबर आझम, मोहम्मद रिझवान, फखर जमान, शाहीन, नसीम शाह, हरिस रौफ, शादाब खान यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत. मला एकाची निवड करायची असेल तर मी बाबरची निवड करेन. तो कर्णधार आहे आणि त्याने चांगले खेळावे आणि संघाला विजय मिळवून देण्यासाठी चांगले निर्णय घ्यावेत, अशी माझी इच्छा आहे.'
भारत, आयर्लंड, कॅनडा आणि अमेरिकेसह पाकिस्तानला अ गटात ठेवण्यात आले आहे.