shahid afridi on pakistan cricket : टी-20 वर्ल्डकप २०२४ मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाने अतिशय वाईट कामगिरी केली आहे. त्यांनी त्यांचे सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले आहेत.
पहिल्या सामन्यात पाकिस्तानला अमेरिकेकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ धावांनी पराभव केला. या खराब कामगिरीनंतर पाकिस्तान संघाला सर्व बाजूंनी टीकेचा सामना करावा लागत आहे. मग तो खराब खेळाचा विषय असो किंवा खेळाडूंच्या फिटनेसचा.
आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने जाहीर केले आहे की, टी-20 विश्वचषक २०२४ संपला की, तो सध्याच्या संघातील अंतर्गत गोष्ट उघड करेल. आफ्रिदीने पाकिस्तान क्रिकेटला खिंडार पाडणाऱ्या लोकांची नावेही उघड करण्याची योजना आखली आहे.
सध्याच्या T20 विश्वचषकात बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. पाकिस्तानने आतापर्यंत दोन सामने खेळले असून दोन्ही सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यजमान अमेरिकेकडून पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये पहिल्यांदा पराभव पत्करावा लागला. यानंतर कट्टर प्रतिस्पर्धी भारताकडून ६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
पाकिस्तान संघाच्या निवड प्रक्रियेवर यापूर्वीच अनेकदा प्रश्न उपस्थित झाले असून माजी क्रिकेटपटू रमीझ राजा आणि कामरान अकमल यांनीही याचा तीव्र निषेध केला होता.
युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद वसीमने एका स्थानिक टीव्ही चॅनलवर शाहिद आफ्रिदीसोबत सहभाग घेतला होता. त्यावेळी आफ्रिदीला विचारण्यात आले की, राष्ट्रीय संघात एकतेचा अभाव आहे का?. माजी कर्णधाराने सांगितले की, मला या क्षणी टिप्पणी करायची नाही आणि टी-20 विश्वचषक संपल्यानंतरच सर्वकाही बोलू."
जिओ न्यूजने आफ्रिदीच्या हवाल्याने म्हटले आहे की, "त्याला बऱ्याच गोष्टी माहित आहेत आणि मलाही." पण आम्ही उघडपणे काहीही बोलू शकत नाही. विश्वचषकानंतर मी उघडपणे सर्वकाही बोलेन. आमच्या लोकांनीच या संघाचे नुकसान केले आहे.'' आफ्रिदीने असेही सांगितले की, तो सध्या त्याचा जावई शाहीन आफ्रिदीबद्दल कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही.
पाकिस्तानचा माजी कर्णधार पुढे म्हणाला, "मी आता काही बोललो तर लोक म्हणतील की मी माझ्या जावयाला पाठिंबा देत आहे, परंतु तसे नाही." माझ्या मुलीने, मुलाने किंवा जावयाने चूक केली तर मी त्यांना बरोबर सांगेन."
शाहीन आफ्रिदीचा प्रवास अलीकडच्या काळात चढ-उतारांनी भरलेला आहे. २४ वर्षीय वेगवान गोलंदाजाला टी-20 आंतरराष्ट्रीय कर्णधार बनवण्यात आले होते, मात्र टी-20 विश्वचषकापूर्वी त्याला हटवून बाबर आझमला कर्णधार बनवण्यात आले."
मंगळवारी (११) टी-20 विश्वचषकात पाकिस्तानचा संघ कॅनडाला भिडणार आहे. बाबर ब्रिगेडसाठी हा सामना करा किंवा मरो असा असेल. आता एका पराभवानंतरही पाकिस्तानचा टी-२० विश्वचषकातील प्रवास संपुष्टात येईल. पाकिस्तानला सुपर-८ फेरी गाठायची असेल, तर उर्वरित सामने मोठ्या फरकाने जिंकावे तर लागतीच शिवाय इतर निकालांवर अवलंबून राहावे लागेल.
संबंधित बातम्या