बांगलादेशने रविवारी (२५ ऑगस्ट) रावळपिंडी येथे खेळल्या गेलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा १० गडी राखून पराभव केला. या पराभवानंतर पाकिस्तानच्या संघातील खेळाडूंमधील मतभेदाच्या बातम्याही समोर आल्या आहेत.
मैदानावरच दोन वरिष्ठ खेळाडूंमध्ये असे काही घडले आहे, ज्यामुळे खळबळ उडाली. बांगलादेशविरुद्धच्या पराभवामुळे पाकिस्तान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सध्याच्या गुणतालिकेत आठव्या स्थानावर पोहोचला आहे. अंतिम फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानला आता येथून जवळपास प्रत्येक सामना जिंकणे आवश्यक आहे.
बांगलादेशने दाखवलेल्या दमदार खेळाला पाकिस्तानकडे उत्तर नव्हते. पाकिस्तान संघ स्वतःची खेळपट्टी वाचण्यात अपयशी ठरला आणि संघात एकाही स्पेशलिस्ट फिरकीपटूचा समावेश केला नाही.
याउलट बांगलादेशने आपल्या फिरकीपटूंवर विश्वास दाखवला आणि त्याचा फायदा त्यांना दुसऱ्या डावात मिळाला, जेव्हा पाकिस्तानचा संपूर्ण संघ दुसऱ्या डावात १४६ धावांत गारद झाला आणि पाचव्या दिवशी एक सत्र बाकी असताना बांगलादेशला केवळ ३० धावांचे लक्ष्य मिळाले.
आता उभय संघांमधील पुढील कसोटी रावळपिंडी येथे ३० ऑगस्टपासून खेळवली जाणार आहे.
या सामन्यात कर्णधार शान मसूद आणि शाहीन आफ्रिदी यांच्यात वाद झाल्याचे वृत्त आहे. वास्तविक, सामन्यादरम्यान टीम हर्डलमध्ये कर्णधार शान मसूदने आफ्रिदीच्या खांद्यावर हात ठेवला होता. पण शाहीनने आफ्रिदीने मसूदचा हात आपल्या खांद्यावरून बाजूला केला. आता याचा व्हिडिओही समोर आला आहे आणि चाहत्यांचा अंदाज आहे की संघात सर्व काही ठीक नाही. यापूर्वी शाहीन आफ्रिदी आणि बाबर आझम यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्याही आल्या होत्या.
टी-20 विश्वचषकात पाकिस्तान पहिल्या फेरीतून बाहेर पडण्याचे मुख्य कारण आफ्रिदी, बाबर आणि रिझवान यांच्यातील मतभेद असल्याचे मानले जात होते. आता मसूद आणि शाहीन यांच्यातील मतभेदामुळे संघासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. याआधी कर्णधार शान मसूद प्रशिक्षक जेसन गिलेस्पीसोबतही जोरदार वाद घालताना दिसला होता.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, रावळपिंडी येथे खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानचा १० गडी राखून पराभव केला. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने पहिल्या डावात ६ बाद ४४८ धावा करून डाव घोषित केला.
प्रत्युत्तरात बांगलादेशने ५६५ धावा केल्या आणि ११७ धावांची आघाडी घेतली. बांगलादेशने दुसऱ्या डावात पाकिस्तानला १४६ धावांत गुंडाळले. बांगलादेशने ३० धावांचे लक्ष्य १० गडी राखून पूर्ण केले.
मुशफिकर रहीमला त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. उभय संघांमधील दुसरी आणि शेवटची कसोटी रावळपिंडी येथे ३० ऑगस्टपासून खेळवली जाणार आहे.
बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील पहिली कसोटी २९ ऑगस्ट २००१ रोजी खेळली गेली. बांगलादेशने पाकिस्तानला कसोटीत पराभूत करण्याची जवळपास २३ वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, दोन्ही देशांदरम्यान १४ कसोटी सामने खेळले गेले असून पाकिस्तानने १२ कसोटी जिंकल्या आहेत. एक कसोटी बांगलादेशने जिंकली असून एक अनिर्णित राहिली आहे.
त्याचवेळी घरच्या मैदानावर पाकिस्तानचा हा आणखी एक लाजिरवाणा पराभव आहे. संघाने ४ मार्च २०२२ पासून घरच्या मैदानावर ९ कसोटी खेळल्या आहेत आणि ५ सामने गमावले आहेत. ४ कसोटी ड्रॉ झाल्या आहेत.