Shaheen Afridi ansha Afridi wedding: आशिया कप 2023 नंतर पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी पुन्हा एकदा लग्नाच्या तयारीत आहे. शाहीनने पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची मुलगी अंशा आफ्रिदी हिच्याशी निकाह केला आहे. आता पुन्हा एकदा तो अंशासोबत लग्न करणार आहे. एका रिपोर्टनुसार, शाहीन आफ्रिदी आशिया कप फायनलच्या दोन दिवसांनंतर १९ सप्टेंबर रोजी पुन्हा लग्न करणार आहे.
खरं म्हणजे शाहीन आफ्रिदीच्या पहिल्या लग्नाला फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्र उपस्थित होते. सोबतच, पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम आणि उपकर्णधार शादाब खानसारखे खेळाडूही या लग्नात दिसले. आता दुसऱ्यांदा शाहीन आणि अंशाला त्यांचे लग्न मोठ्या थाटामाटात करायचे आहे.
शाहीनच्या लग्नाची बारात सेरेमीन १९ सप्टेंबरला होणार आहे तर त्यानंतर २१ सप्टेंबरला रिसेप्शन होणार आहे. यापूर्वी शाहीन आणि अंशाने या वर्षी फेब्रुवारीमध्ये लग्न केले होते.
शाहीन आफ्रिदी सध्या आशिया कपसाठी श्रीलंकेत आहे. सध्या आशिया कपचे सुपर-4 सामने खेळवले जात आहेत. हे सर्व सामने कोलंबोत होणार आहेत. पाकिस्तानचा संघ पुढील सामना १० सप्टेंबरला भारताविरुद्ध खेळणार आहे.
सध्या आशिया कप 2023 मध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्यांमध्ये शाहीन तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाने आतापर्यंत ३ सामन्यात ७ विकेट घेतल्या आहेत, ज्यामध्ये भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याचे ३५ धावांत ४ विकेट्स घेतल्या होत्या.
ग्रुप स्टेजमध्ये खेळलेला भारत-पाक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्याचवेळी, सुपर-4 मध्ये या दोन्ही संघात होणाऱ्या सामन्यावरही पावसाचे सावट दिसत आहे, या पार्श्वभूमीवर आशियाई क्रिकेट परिषदेने राखीव दिवस ठेवला आहे.