मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs ENG Test : ऑली पोपसह इंग्लंडचे अनेक खेळाडू आजारी, तिसऱ्या कसोटीपूर्वी संपूर्ण संघ भारत सोडणार!

IND vs ENG Test : ऑली पोपसह इंग्लंडचे अनेक खेळाडू आजारी, तिसऱ्या कसोटीपूर्वी संपूर्ण संघ भारत सोडणार!

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 05, 2024 08:50 PM IST

India vs England Test Series : एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुत्रांनुसार, इंग्लंडचे अनेक खेळाडू आजारी पडले आहेत. अशा परिस्थितीत आता संपूर्ण संघ भारत सोडणार आहे.

India vs England Test Series
India vs England Test Series (REUTERS)

India vs England 2nd Test Vizag : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा १०६ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.

या सामन्यात भारताने इंग्लंडला विजयासाठी ३९९ धावांचे लक्ष्य दिले होते, यानंतर या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ २९२ धावांवर गारद झाला. आता दोन्ही संघांमधील तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये १५ फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे.

पण यापूर्वी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुत्रांनुसार, इंग्लंडचे अनेक खेळाडू आजारी पडले आहेत. अशा परिस्थितीत आता संपूर्ण संघ भारत सोडणार आहे.
इंग्लंडचे खेळाडू आजारी पडले

दुसऱ्या कसोटीतील पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याची पत्रकार परिषद झाली. यात त्याने संघातील अनेक सदस्य आजारी असल्याचा खुलासा केला. तसेच, अनेक खेळाडू अजारी असतानाही चौथ्या दिवशी मैदानावर उतरल्याचे स्टोक्सने सांगितले.

दुसऱ्या कसोटीनंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्याने सांगितले की, संघातील अनेक खेळाडू आजारी आहेत. दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी बेन फॉक्स, ऑली पोप आणि टॉम हार्टली पूर्णपणे फिट नव्हते, असे त्याने सांगितले. 

स्टोक्स पुढे म्हणाला की, सर्व खेळाडूंमध्ये अशीच लक्षणे दिसत आहेत. कदाचित त्यांना काही विषाणूंची लागण झाली आहे. तसेच, स्टोक्स पुढे म्हणाला की, तुम्हाला वाटेल की पराभवानंतर आम्ही ही कारणं देत आहोत, पण तसं नाही."

इंग्लंडचा संघ अबुधाबीला जाणार

यानंतर आता इंग्लंडचा संघ भारत सोडणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे.  भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना १५ फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. अशा स्थितीत तिसऱ्या कसोटीला अजून १० दिवस बाकी आहेत. अशा स्थितीत आता इंग्लंडचा संघ अबुधाबीला रवाना होईल आणि तिथेच तिसऱ्या कसोटीसाठी तयारी करेल. यानंतर इंग्लिश संघ १२ किंवा १३ फेब्रुवारीपर्यंत भारतात परतेल. याआधी इंग्लंड संघाने भारत दौऱ्यासाठी अबुधाबीमध्येच तयारी केली होती.

 

 

WhatsApp channel