पाकिस्तान संघ घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिला सामना रावळपिंडीच्या मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात २ दिवसांच्या खेळानंतर यजमान पाकिस्तानची पकड चांगलीच मजबूत दिसत आहे.
दुसऱ्या दिवसाच्या (२१ ऑगस्ट) खेळात पाकिस्तानचा उपकर्णधार सौद शकीलने १४१ धावांची खेळी केली तर मोहम्मद रिझवानने नाबाद १७१ धावांची खेळी केली.
रिझवान आपले द्विशतक पूर्ण करेल अशी सर्वांनाच अपेक्षा होती, पण पाकिस्तानी कसोटी कर्णधार शान मसूदने संघाचा पहिला डाव ४४८ धावांवर घोषित करून सर्वांना आश्चर्यचकित केले.
यानंतर, रिजवानने द्विशतक पूर्ण होऊ न देण्यामागे षडयंत्र असल्याच्या बातम्याही समोर येऊ लागल्या, ज्यावर दिवसाचा खेळ संपल्यावर उपकर्णधार सौद शकीलने स्पष्टीकरण दिले.
रिजवानचे द्विशतक होण्याआधीच डाव घोषित करण्यात आला. याबाबत विचारले्लया प्रश्नाचे उत्तर देताना सौद शकील म्हणाला की, बघा, रिझवानच्या द्विशतकाबाबत काही प्रश्न असेल तर मला नाही वाटत की डाव घोषित करण्यात कोणतीही घाई गडबड झाली आहे.
कारण डाव घोषित होण्याच्या तासाभरापूर्वी रिझवानला कळवण्यात आले की आपण कोणत्या वेळेला डाव घोषित करणार आहोत. डाव घोषित करण्यापूर्वी आम्ही ४५० धावांच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करू, असे त्याला सांगण्यात आले होते.
पाकिस्तानी संघाचा कर्णधार शान मसूदने संघाचा पहिला डाव घोषित केला तेव्हा द्विशतक पूर्ण न झाल्याची निराशा मोहम्मद रिझवानच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.