पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. हा कसोटी सामना आता रोमहर्षक वळणावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावाच लागणार आहे. कारण बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते.
दरम्यान, रावळपिंडी कसोटी सामन्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओनंतर पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठ्या ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
वास्तविक, पाकिस्तानचा उपकर्णधार सौद शकील याने एक सोपा झेल सोडला. हा झेल मिस झाल्यानंतर अंपायर रिचर्ड केटलबरो हेही आश्चर्यचकित झाले. आता पाकिस्तान क्रिकेट संघ आणि सौद शकील यांना सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे.
'खराब क्षेत्ररक्षण हीच पाकिस्तानची ओळख'
खराब क्षेत्ररक्षण ही पाकिस्तानची ओळख असल्याचे सोशल मीडियावर चाहत्यांचे म्हणणे आहे. मात्र, हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत.
या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानने पहिल्या डावात सर्वबाद २७४ धावा केल्या. पाकिस्तानकडून सॅम अयुबने सर्वाधिक ५८ धावा केल्या. तर शान मसूदने ५७ धावांची खेळी केली. आघा सलमानने ५४ धावांचे योगदान दिले.
बांगलादेशकडून मेहंदी हसन मिराजने सर्वाधिक ५ बळी घेतले. तर तस्किन अहमदला ३ विकेट मिळाले. याशिवाय नाहिद राणा आणि शाकिब अल हसन यांनी १-१ विकेट घेतली.
प्रत्युत्तरात बांगलादेशची सुरुवात अतिशय खराब झाली. त्यांचे ६ फलंदाज अवघ्या २६ धावांत तंबूत परतले होते. मात्र, यानंतर विकेटकीपर फलंदाज लिटन दास आणि मेंहदी हसन मिराज यांनी सावध खेळी करत संघाला सावरले.
हे वृत्त लिहेपर्यंत बांगलादेशची धावसंख्या ९ बाद १९६ धावा होती. सध्या लिटन दास ८५ धावा करून खेळत आहे. तर मेहंदी हसन मिराज ७८ धावा करून बाद झाला. दोन्ही खेळाडूंमध्ये १६५ धावांची भागीदारी झाली.