भारत आणि बांगलादेश कसोटी मालिकेला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा आधीच झाली आहे, संघात युवा फलंदाज सरफराज खानचा देखील समावेश करण्यात आला आहे.
या दरम्यान सरफराज खानची एक मुलाखत चर्चेत आली आहे. या मुलाखतीत त्याने महान फलंदाज विराट कोहलीसोबतच्या पहिल्या भेटीबाबत सांगितले आहे.
सरफराज खानने विराट कोहलीला पहिल्यांदा भेटल्याचा एक रंजक किस्सा सांगितला. सरफराज हा आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला आहे, त्यावेळी तो पहिल्यांदा विराट कोहलीला भेटला होता.
जिओ सिनेमावर बोलताना सरफराज खान म्हणाला, "त्याची पर्ननॅलिटी अतुलनीय आहे. जेव्हा मी त्याला पाहिलं, अगदी सामन्यापूर्वीच्या मीटिंगमध्येही, तो जबाबदारी स्वीकारायचा आणि प्रत्येकाला सांगायचा की तो एका विशिष्ट गोलंदाजाविरुद्ध किती धावा करेल. प्रत्येकजण इतकं धाडसी असणं की सगळ्यांसमोर उभं राहून इतकं सकारात्मक बोलणं आणि नंतर दुसऱ्या दिवशी काहीतरी करणं ही खूप अनोखी क्षमता आहे."
पुढे बोलताना सरफराज म्हणाला, “मी त्याला एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पहिल्यांदा भेटलो. मी २१ चेंडूत ४५ धावा केल्या होत्या आणि त्याने माझ्यासमोर डोकं टेकवले (कौतुकासाठी). त्या दिवशी मला खूप छान वाटले. त्याच्यासोबत भारतीय ड्रेसिंग रूम शेअर करण्याचे माझे स्वप्न होते.”
१९ सप्टेंबरपासून चेन्नई येथे होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी विराट कोहली आणि सरफराज खान यांचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. मात्र, टीम इंडियात सामील झाल्यानंतरही सरफराज दुलीप ट्रॉफी खेळणार आहे.
अशा परिस्थितीत पहिल्या कसोटीत बॅकअप म्हणून सरफराजला टीम इंडियात स्थान देण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. चेन्नई कसोटीत सर्फराजऐवजी केएल राहुलला प्राधान्य दिले जाईल, असे म्हटले होते. आता चेन्नईतील चेपॉक येथे होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारत कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह खेळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.