IND vs NZ 1st Test Sarfaraz Khan Century : बंगळुरू कसोटीत सरफराज खान याने शानदार शतक झळकावले आहे. त्याचे हे आंतरराष्ट्रीय कसोटी करिअरचे पहिलेच शतक आहे. सर्फराज खानने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक ११० चेंडूत झळकावले. या खेळीत त्याने आतापर्यंत १४ चौकार आणि ३ षटकार मारले आहेत. सरफराजचे शतक टीम इंडिया अडचणीत असताना आले आहे, त्यामुळे हे शतक चाहत्यांच्या अनेक वर्ष लक्षात राहणारे आहे.
तत्पूर्वी, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. १६ ऑक्टोबरपासून बेंगळुरू एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. भारतीय संघ पहिल्या डावात पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाने शानदार पुनरागमन केले. या पुनरागमनात सरफराज खानने मोठे योगदान दिले आहे.
दुसऱ्या डावात टीम इंडियाची दुसरी विकेट रोहित शर्माच्या रूपाने गमवावी लागली, त्यानंतर सरफराज खान चौथ्या क्रमांकावर क्रीझवर आला. सर्फराजने विराट कोहलीसोबत १६३ चेंडूत १३६ धावांची भागीदारी केली. विराट कोहली बाद झाल्यानंतर त्याने ऋषभ पंतसोबत खेळी सुरू ठेवली आहे.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सर्फराज ७० धावांवर नाबाद होता, तर चौथ्या दिवसाचा खेळ सुरू असताना ऋषभ पंत त्याच्यासोबत फलंदाजीला आला. सर्फराजने सकारात्मक पद्धतीने फलंदाजी सुरू ठेवली आणि वेगवान गतीने धावा काढण्यास सुरुवात केली, त्याने ११० चेंडूत पहिले कसोटी शतक पूर्ण केले.
सरफराजच्या कसोटी कारकिर्दीतील हा केवळ चौथा सामना आहे आणि या शतकापूर्वी त्याने या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान तीन अर्धशतकांच्या खेळीही खेळल्या होत्या.
सरफराज खान गेल्या अनेक वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी करत होता पण त्याला टीम इंडियामध्ये स्थान मिळत नव्हते. या वर्षी, भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेत त्याला टीम इंडियासाठी कसोटी क्रिकेटची पहिली इनिंग खेळण्याची संधी मिळाली आणि सरफराजने याचा पुरेपूर फायदा घेतला आणि पहिल्याच डावात अर्धशतक झळकावले.
न्यूझीलंडविरुद्धची ही कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी सर्फराज खान इराणी ट्रॉफी सामना खेळण्यासाठी गेला होता. ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून द्विशतक झळकले होते.