भारताचा डॉन ब्रॅडमन अशी ओळख असलेला सरफराज खान याची अखेर टीम इंडियात एन्ट्री झाली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि भारत अ संघासाठी खोऱ्याने धावा करूनही सरफराजला टीम इंडियात स्थान मिळत नव्हते.
मात्र आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी सरफराजचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. अलीकडेच त्याने इंग्लंड लायन्सविरुद्ध १६१ धावांची शानदार खेळी केली होती. सरफराजसोबतच वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार यांचाही भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
२६ वर्षीय सरफराज खानचा प्रथम श्रेणी क्रिकेटधील रेकॉर्ड खूपच मजबूत आहे. ४५ सामन्यांच्या ६६ डावांमध्ये त्याने ६९.८५ च्या सरासरीने ३९१२ धावा केल्या आहेत. यामध्ये १४ शतके आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. ३०१ ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. तो मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळतो.
सरफराज खान गेल्या ४ वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी आहे. सरफराजने २०२२-२३ हंगामात ६ सामने खेळले, ज्यामध्ये या युवा फलंदाजाने ९२.६६ च्या सरासरीने ५५६ धावा केल्या. तसेच तीन शतके ठोकली. यापूर्वी, २०२१-२२ हंगामातील ६ सामन्यांमध्ये सरफराज खानने १२२.७५ च्या सरासरीने ९८२ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये ४ शतकांची नोंद आहे.
तर सरफराजने यापूर्वी २०१९-२० च्या हंगामात मुंबईसाठी ६ सामन्यांत १५४.६६ च्या उत्कृष्ट सरासरीने ९२८ धावा केल्या. यात त्याने ३ शतके झळकावली.
अलीकडेच सर्फराज खान इंग्लंड लायन्सविरुद्ध अप्रतिम फॉर्ममध्ये दिसला. सरफराज खानने इंग्लंड लायन्सविरुद्ध अनुक्रमे ९६, ४,५५ आणि १६१ धावा केल्या. याआधी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सरफराज खानने दक्षिण आफ्रिका-अ विरुद्ध ६८ आणि ३४ धावांची दमदार इनिंग खेळली होती.
रवींद्र जडेजासोबत केएल राहुलही इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. या दोघांच्या जागी ३ खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे. फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने भारतासाठी ६ कसोटी खेळल्या आहेत. तर डावखुरा फिरकी गोलंदाज सौरभ कुमारने अद्याप पदार्पण केलेले नाही.
दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार.