मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ind vs Eng Test : सरफराज-पाटीदारचं कसोटी पदार्पण होणार? गिल-अय्यरला डच्चू मिळणार

Ind vs Eng Test : सरफराज-पाटीदारचं कसोटी पदार्पण होणार? गिल-अय्यरला डच्चू मिळणार

Jan 30, 2024 03:12 PM IST

India vs England 2nd Test : दुसऱ्या कसोटीआधी भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे दोन खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळू शकते.

India vs England 2nd Test
India vs England 2nd Test (Tharun Vinny)

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीची तयारी सुरू झाली आहे. दुसरा सामना २ फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे. दुसरा सामना टीम इंडियासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण इंग्लंडने पहिला सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता टीम इंडियाला दुसरा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल. 

दरम्यान, दुसऱ्या कसोटीआधी भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे दोन खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळू शकते. पण, कर्णधार रोहित आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यासाठी तयार होतील की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

केएल राहुल-जडेजा दुसऱ्या कसोटीतून बाहेर

हैदराबाद कसोटीत चांगली फलंदाजी करणारे केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांना दुखापत झाली आहे. त्यामुळे ते दुसरा सामना खेळू शकणार नाही. अशा परिस्थितीत बीसीसीआयने सर्फराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार यांचा संघात समावेश केला आहे. हे सर्व खेळाडू भविष्यात संघासोबत राहणार की दुसऱ्या कसोटीनंतर बाहेर पडणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारण तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी संपूर्ण संघाची घोषणा होणे बाकी आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सरफराज खान आणि रजत पाटीदार पदार्पण करणार?

दुसऱ्या कसोटी सामन्यातून सरफराज खान किंवा रजत पाटीदार कसोटी पदार्पण करू शकतात. तर, रवींद्र जडेजाच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला स्थान दिले जाऊ शकते. मधल्या फळीत फलंदाजी करणाऱ्या विराट कोहलीचा बदली म्हणून रजत पाटीदार आधीच संघात सामील झाला होता.

अशा परिस्थितीत राहुलच्या जागी दोन खेळाडू आपला दावा मांडत आहेत. रजत पाटीदार आणि सरफराज यांना संधी मिळाल्यास हे त्यांचे कसोटी पदार्पण असेल. दोघांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.

गिल-अय्यरऐवजी तर सरफराज, पाटीदारला संधी मिळू शकते

दरम्यान, कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड रजत पाटीदार आणि सर्फराज खान या दोघांनाही संधी देऊ शकतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वास्तविक, एक फलंदाज केएल राहुलची जागा घेईल. 

परंतु शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरबद्दल काय निर्णय होतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे. कारण गिल आणि अय्यर कसोटीत फ्लॉप ठरले आहेत. गेल्या काही काळापासून त्यांची कसोटीतील कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. श्रेयस अय्यर किंवा गिलला दुसऱ्या कसोटीतून डच्चू मिळाल्यास सरफराज आणि पाटीदार दोन्ही खेळू शकतात.

WhatsApp channel