भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये सुरू आहे. या कसोटी सामन्यातून युवा क्रिकेटर सरफराज खानने भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सरफराजने पदार्पणाच्या सामन्यात ६२ धावांची खेळी केली.
याआधी सरफराज खान देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करत होता. पण त्याला टीम इंडियातून बोलावणे येत नव्हते. मात्र, विराट कोहली, केएल राहुलच्या अनुपस्थितीत त्याला टीम इंडियात स्थान मिळाले. त्याने या संधीचे सोनं केले आहे.
राजकोट कसोटीत पदार्पण केल्यानंतर सरफराज खानला वेगळी ओळख मिळाली. सरफराज खानच्या पदार्पणाच्या कसोटीत त्याचे वडील नौशाद खान आणि पत्नी रोमाना झहूर हे उपस्थित होते. सरफराजला डेब्यू कॅप मिळाल्यानंत तो धावत वडिलांकडे गेला. हा क्षण प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याला भावनिक करून गेला.
सरफराज खान हा मुळचा उत्तर प्रदेशातील आझमगडचा आहे. तर त्याचे सासर काश्मीर आहे. सरफराज खानचा जन्म २२ ऑक्टोबर १९९७ ला मुंबईत झाला. मात्र सरफराजचे कुटुंब आझमगडच्या सागडी तालुक्यातील आहे.
सरफराज खानचे वडील आणि प्रशिक्षक नौशाद खान हे मुंबईतील आझाद मैदानावर क्रिकेटचे प्रशिक्षण देतात. सरफराजचा बहुतांश वेळ आझाद मैदानावरच गेला आहे.
विशेष म्हणजे, सरफराज खानचे वडील नौशाद यांचे क्रिकेटर होण्याचे स्वप्न होते, परंतु ते स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलांना क्रिकेटर बनवण्याचा निर्णय घेतला.
सरफराज खानची आई तबस्सुम गृहिणी आहे. तर सरफराजने ६ ऑगस्ट २०२३ रोजी काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यातील पाशपोरा गावात राहणाऱ्या रोमाना जहूरशी लग्न केले. रोमनाने दिल्लीतून एमएससीचे शिक्षण घेतले आहे.
तसेच, सरफराजचा लहान भाऊ मुशीर खानदेखील नुकताच टीम इंडियाकडून अंडर १९ वर्ल्डकप खेळून आला आहे. त्याने या वर्ल्डकपमध्ये २ शतकं ठोकली होती. त्याच्या भावाप्रमाणेच मुशीरही त्याच्या दमदार फलंदाजीसाठी ओळखला जातो. मुशीर आणि सरफराज दोघेही त्यांच्या वडिलांकडून प्रशिक्षण घेतात.
संबंधित बातम्या