IND vs BAN : संजू-सूर्यानं बांगलादेशला धु-धु धुतलं, भारताचा डाव पूर्ण होण्याआधीच अनेक विक्रम मोडले
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs BAN : संजू-सूर्यानं बांगलादेशला धु-धु धुतलं, भारताचा डाव पूर्ण होण्याआधीच अनेक विक्रम मोडले

IND vs BAN : संजू-सूर्यानं बांगलादेशला धु-धु धुतलं, भारताचा डाव पूर्ण होण्याआधीच अनेक विक्रम मोडले

Updated Oct 12, 2024 08:53 PM IST

ind vs ban highlights : भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसरा टी-20 सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात संजू सॅमसन याने वादळी शतक ठोकले आहे.

 IND vs BAN : संजू-सूर्यानं बांगलादेशला धु-धु धुतलं, भारताचा डाव पूर्ण होण्याआधीच अनेक विक्रम मोडले
IND vs BAN : संजू-सूर्यानं बांगलादेशला धु-धु धुतलं, भारताचा डाव पूर्ण होण्याआधीच अनेक विक्रम मोडले (AFP)

भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसऱ्या टी-20 सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन यांनी हैदराबादमध्ये धुमाकूळ घातला आहे. राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. त्यानंतर अभिषेक शर्माच्या रूपाने टीम इंडियाने पहिली विकेट लवकर गमावली.

मात्र त्यानंतर संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव यांनी गोलंदाजांची दाणादाण उडवली आणि अवघ्या ७.१ षटकांत धावफलकावर १०० हून अधिक धावांचा पाऊस पाडला.

डावाच्या तिसऱ्याच षटकात अभिषेक शर्मा बाद झाला, पण त्यानंतर संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव यांनी कमान सांभाळली. यापूर्वी भारताने कोणत्याही टी-20 सामन्यात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक ८२ धावा केल्या होत्या.

भारताने २०२१ मध्ये स्कॉटलंडविरुद्ध २ विकेट गमावून ८२ धावा केल्या होत्या. आता टीम इंडियाने बांगलादेशविरुद्ध हैदराबादमध्ये केवळ एक विकेट गमावून ८२ धावा करत आपला विक्रम सुधारला आहे. दरम्यान, सॅमसनने केवळ २२ चेंडूत अर्धशतक ठोकले.

सॅमसनचे सर्वात वेगवान अर्धशतक

आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशविरुद्ध सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा भारतीय फलंदाज होण्याचा विक्रम संजू सॅमसनच्या नावावर झाला आहे. त्याच्याआधी हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता, ज्याने २०१९ मध्ये बांगलादेशी गोलंदाजांचा धुव्वा उडवून २३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते.

मात्र सॅमसनने केवळ २२ चेंडूत ही कामगिरी केली आहे. मात्र, सर्वात वेगवान टी-२० अर्धशतक ठोकण्याच्या विक्रमापासून सॅमसन खूप दूर आहे.

सॅमसनच्या टी20 कारकिर्दीतील हे केवळ दुसरे अर्धशतक आहे, ज्याचे शतकात रूपांतर करण्यात तो यशस्वी ठरला. त्याने ४० चेंडूत आपले शतक पूर्ण केले. सॅमसन ४७ चेंडूत १११ धावांवर बाद झाला. तो षटकार मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. त्याने ८ षटकार आणि ११ चौकार मारले. तर सूर्याने ३५ चेंडूत ७५ धावा ठोकल्या. त्याने ८ चौकार आणि ५ षटकार मारले.

Whats_app_banner