आयपीएल २०२५ मध्ये अनेक बदल पाहायला मिळणार आहेत. कारण आगामी आयपीएलपूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. या लिलावापूर्वी आयपीएल संघ अनेक स्टार खेळाडूंना रीलीज करतील. त्यामुळे अनेक खेळाडूंचे संघ बदलणार आहेत. आता राजस्थान रॉयल्स संघाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
राजस्थान रॉयल्सचा यष्टीरक्षक फलंदाज आणि कर्णधार संजू सॅमसन आगामी हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसू शकतो.
रिपोर्टनुसार, चेन्नई सुपर किंग्ज संजू सॅमसनला आपल्या संघात घेऊ इच्छित आहे. तसेच, असे म्हटले जात आहे की चेन्नईला सॅमसनला दीर्घकाळ संघात आणायचे आहे. चेन्नई ट्रेडद्वारे सॅमसनला आपल्या संघात समाविष्ट करू शकते.
रिपोर्टनुसार, राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसनच्या बदल्यात शिवम दुबेला मागितले आहे. राजस्थान रॉयल्स चेन्नईशी केवळ पैशांची डील करू इच्छित नाही. राजस्थानने सॅमसनच्या जागी शिवम दुबेची मागणी केली आहे. आता चेन्नई आणि राजस्थानमध्ये हा करार होतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
दरम्यान, या व्यवहाराबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आतापर्यंत आयपीएल २०२५च्या संदर्भात आलेल्या सर्व बातम्या मीडिया रिपोर्ट्स आणि सुत्रांच्या माहितीवर आधारित आहेत. आतापर्यंत कोणत्याही फ्रँचायझी किंवा खेळाडूने किंवा आयपीएलने असे कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही.
IPL २०२५ पूर्वी मेगा लिलाव आयोजित केला जाणार आहे. याआधी मेगा लिलावात संघ केवळ ४ खेळाडूंना रिटेन शकत होते. मात्र, आता आयपीएलने ६ खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी दिल्याचे वृत्त आहे. आतापर्यंत आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल किंवा बीसीसीआयने याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही.