Sanju Samson, Most 50+ Scores For An Indian keeper Batter In T20I : जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर स्फोटक फलंदाजी करताना संजू सॅमसन याने इतिहास रचला आहे. संजू सॅमसन हा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा ५० किंवा त्याहून धावा करणारा भारताचा पहिला विकेटकीपर फलंदाज ठरला आहे.
एका खास बाबतीत त्याने युवा फलंदाज इशान किशनला मागे टाकले आहे. इशान किशनने यष्टीरक्षक फलंदाज म्हणून तीनदा ५० प्लस इनिंग्स खेळल्या आहेत. संजूने आजच्या सामन्यात शतक झळकावून ईशान किशनला मागे टाकले.
इतकंच नाही तर T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या एका वर्षात तीन शतकं झळकावणारा संजू सॅमसन जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. याआधीच त्याने हैदराबादमध्ये बांगलादेशविरुद्ध १११ धावांची शतकी खेळी खेळली होती. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डर्बनमध्येही त्याने १०७ धावा केल्या होत्या. आता जोहान्सबर्गमध्ये नाबाद १०९ धावा करत त्याने ही मोठी कामगिरी केली आहे.
संजू सॅमसन (नाबाद १०९) व्यतिरिक्त, आज (१५ नोव्हेंबर २०२४) युवा फलंदाज तिलक वर्मा याने १२० धावांची खेळी केली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने ४७ चेंडूत १२० धावांची नाबाद शतकी खेळी केली. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच संघातील दोन फलंदाजांनी एकाच डावात शतके ठोकण्याची ही पहिलीच वेळ आहे.
इतकेच नाही तर तिलक वर्मा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग दोन शतके ठोकणारा जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी संजू सॅमसनने हे विशेष यश संपादन केले होते.
संजूने बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या T20 सामन्यात आणि आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात शतके झळकावून हा विक्रम आपल्या नावावर केला होता, तर तिलकने आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या T20 सामन्यात सलग शतके झळकावून ही कामगिरी केली.