टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन याने शशी थरूर यांची भेट घेतली. बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात संजू सॅमसन याने झंझावाती शतक झळकावले. संजूने १११ धावांची इनिंग खेळली. या खेळीत त्याने ४७ चेंडूंचा सामना करताना ११ चौकार आणि ८ षटकार मारले.
या सामन्यानंतर संजूच्या टॅलेंटची सर्वत्र चर्चा होत आहे. मालिका संपल्यानंतर संजू तिरुअनंतपुरम येथील त्याच्या घरी परतला तेव्हा काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी त्याची भेट घेतली आणि त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याचे अभिनंदन केले.
शशी थरूर यांनी त्यांच्या X हँडलवर संजूसोबतच्या भेटीचे काही फोटो अपलोड केले आहेत. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, ""टॉन-अप संजू" हिरोचे स्वागत करताना आनंद झाला!"
संजू सॅमसनने आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप कमी सामने खेळले आहेत. तरी त्याचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. या चाहत्यांमध्ये काँग्रेस नेते शशी थरूर हेदेखील आहे. थरूर हे संजू सॅमसनचे कट्टर समर्थक आहेत, हे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे.
संजू सॅमसनला सातत्याने संधी का मिळत नाही? असे संजूचे चाहते नेहमी विचारत असतात. याच चाहत्यांमध्ये शशी थरूरदेखील आहेत.
विशेष म्हणजे, संजू १४ वर्षांचा असतानापासून थरूर यांनी त्याचे टॅलेंट जवळून पाहिले आहे. त्यामुळे ते संजूचे टॅलेंट आणि स्कील चांगले ओळखतात. अशा स्थितीत तेही संजूला सातत्याने संधी द्यावी, असे ट्वीट अनेकदा करताना दिसतात.
बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या T20 सामन्यात संजूने लेगस्पिनर रिशाद हुसैन याच्या एका षटकात सलग ५ षटकार ठोकले आणि ४० चेंडूत शतक पूर्ण केले. त्याने सूर्यकुमार यादवसोबत दुसऱ्या विकेटसाठी १२ षटकात १७३ धावांची भागीदारी केली.
प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्या दोन शब्दांमुळे मी अशी फलंदाजी केल्याचे संजूने सामन्यानंतर सांगितले. सामना संपल्यानंतर संजू आणि सूर्यकुमार यादव यांनी बीसीसीआय टीव्हीवर संवाद साधला. सूर्यकुमारने संजूला विचारले की, तू खूप दिवसांपासून या खेळीची वाट पाहत होतास. या खेळीबद्दल काय सांगशील?
संजू म्हणाला, "मी खूप आनंदी आहे. माझ्याकडे शब्द नाहीत. मी खूप भावूक आहे. पण मी देवाचे आभार मानतो की हा दिवस आला आहे. प्रत्येकाची स्वतःची वेळ असते. मी माझे काम करत राहिलो. माझ्या स्वतःवर विश्वास ठेवला. त्या वेळी तू तिथे होतास याचाही मला आनंद आहे."