भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेचा शेवटचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा १५० धावांनी पराभव केला. या सामन्यातील विजयचा हिरो अभिषेक शर्मा ठरला. त्याने एकट्याने अवघ्या ५४ चेंडूत १३५ धावांची पाऊस पाडला.
अभिषेक शर्माच्या शतकाच्या बळावर भारताने २० षटकात २४७ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ १० षटकात ९७ धावांवर गारद झाला.
दरम्यान या सामन्यात टीम इंडियाचा स्फोटक सलामीवीर संजू सॅमसन आणि जोफ्रा आर्चर यांच्यात जबरदस्त सामना पाहायला मिळाला. विशेष म्हणजे दोन्ही खेळाडूंमधील हे युद्ध सामन्याच्या पहिल्या चेंडूपासून सुरू झाले.
वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत चाहत्यांची नजर फक्त सॅमसन आणि आर्चर यांच्यातील स्पर्धेकडे होती. मालिकेतील पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात आर्चरने संजू सॅमसनला आपला शिकार बनवले होते. संजू सारख्याच पद्धतीने तीनही वेळा बाद झाला.
अशा स्थितीत मालिकेतील शेवटच्या सामन्यात संजू सॅमसन जोफ्रा आर्चरच्या शॉर्ट बॉलचा सामना कसा करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणे आर्चरने पहिले षटक टाकले आणि त्याने येताच बाऊन्सरचा प्रयत्न केला. यावेळी फरक एवढाच होता की सॅमसन तयार होता आणि त्याने ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन पुल शॉट मारला. चेंडू थेट डीप स्क्वेअर लेगच्या सीमारेषेबाहेर ६ धावांवर गेला आणि स्टेडियममधील गोंगाट आणखी वाढला.
इथून ही स्पर्धा खूपच चुरशीची होणार हे निश्चित झाले आणि तसेच झाले. आर्चरने पुढच्या दोन चेंडूंचा वेग आणखी वाढवला आणि शॉर्ट चेंडू टाकले.
षटकात दुसरा चेंडू आर्चरने ऑफ स्टंपच्या बाहेर टाकाल, यावर संजूने ऑफ साईडच्या दिशेने जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला पण तो बीट झाला. यानंतर तिसरा चेंडू १४८ किलोमीटर प्रतितास वेगाने आला आणि संजूच्या ग्लोव्हजवर आदळला. यानंतर फिजीओनी येऊन बोटावर उपचार केले. यानंतर काही वेळाने सामना पुन्हा सुरू झाला आणि त्यानंतर सॅमसनने दुसरा पुल शॉट मारला आणि हा चेंडूही षटकार गेला, शेवटच्या चेंडूवर संजूने थर्ड मॅनच्या दिशेने चौकार मारला. अशा प्रकारे पहिल्याच षटकात संजूने १६ धावा फटकावल्या आणि सामन्याची टोन सेट केला.
पण सॅमसनचे हे आक्रमण फार काळ टिकू शकले नाही. तो पुन्हा एकदा शॉर्ट बॉलवर झेलबाद झाला. यावेळी मार्क वुडने त्याची शिकार केली. दुसऱ्या षटकात वुडने शॉर्ट बॉल टाकला आणि पुन्हा सॅमसनने पुल शॉट मारला.
फरक एवढाच होता की यावेळी क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगच्या सीमारेषेवर उभा होता आणि त्याने कॅच घेऊन सॅमसनचा डाव संपवला. अशाप्रकारे या मालिकेतील पाचही सामन्यांमध्ये संजू सॅमसन शॉर्ट बॉल्सचा बळी ठरला.
संबंधित बातम्या