Sanju Samson Century : संजू सॅमसनचं वादळ डरबनपर्यंत पोहोचलं, सलग दुसऱ्या टी-20 सामन्यात शतक ठोकून इतिहास रचला
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Sanju Samson Century : संजू सॅमसनचं वादळ डरबनपर्यंत पोहोचलं, सलग दुसऱ्या टी-20 सामन्यात शतक ठोकून इतिहास रचला

Sanju Samson Century : संजू सॅमसनचं वादळ डरबनपर्यंत पोहोचलं, सलग दुसऱ्या टी-20 सामन्यात शतक ठोकून इतिहास रचला

Nov 08, 2024 10:05 PM IST

Sanju Samson century Vs South Africa : टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन याने शतक ठोकले आहे. त्याचा डाव १०७ धावांवर संपला, ज्यात त्याने ७ चौकार आणि १० गगनचुंबी षटकार मारले.

Sanju Samson : संजू सॅमसनचं वादळ डरबनपर्यंत पोहोचलं, सलग दुसऱ्या टी-20 सामन्यात शतक ठोकून इतिहास रचला
Sanju Samson : संजू सॅमसनचं वादळ डरबनपर्यंत पोहोचलं, सलग दुसऱ्या टी-20 सामन्यात शतक ठोकून इतिहास रचला (AP)

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेला आजपासून प्रारंभ झाला आहे. मालिकेतील पहिल्याच टी-20 सामन्यात टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन याने शतक ठोकले आहे.

संजूने ४७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे. यासह, सॅमसन आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटच्या इतिहासात सलग दोन डावात शतके झळकावणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. सॅमसनने याआधी बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात १११ धावांची इनिंग खेळली होती. आता त्याच्या पुढच्याच डावात सॅमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावले आहे.

संजू सलग षटकार मारण्याच्या नादात १०७ धावांवर झेलबाद झाला. त्याने ५० चेंडूत ७ चौकार आणि १० गगनचुंबी षटकार मारले.

संजू सॅमसनने अभिषेक शर्मासोबत टीम इंडियाच्या इनिंगची सुरुवात केली. अभिषेक अवघ्या ७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला, पण संजू सॅमसन क्रीजवर राहिला. दरम्यान, त्याने २७ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे पुढील ५० धावा करण्यासाठी त्याने केवळ २० चेंडू खेळले.

त्याने कर्णधार सूर्यकुमार यादवसोबत ६६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. तर त्याला तिलक वर्मानेही चांगली साथ दिली, त्याने १८ चेंडूत ३३ धावा केल्या.

टी-20 क्रिकेटमध्ये सलग इनिंगमध्ये शतके

सलग दोन T20 सामन्यात शतक झळकावणारा संजू सॅमसन पहिला भारतीय ठरला आहे. त्याच्याआधी फ्रान्सचा गुस्ताव्ह मॅककीन, दक्षिण आफ्रिकेचा रिले रुसो आणि इंग्लंडचा फिल सॉल्ट यांनी टी-२० क्रिकेटमध्ये सलग दोन शतके झळकावण्याचा पराक्रम केला आहे.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

भारत : संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, आवेश खान, वरुण चक्रवर्ती.

दक्षिण आफ्रिका : रायन रिकेल्टन (विकेटकीपर), एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, पॅट्रिक क्रुगर, मार्को जॅन्सेन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, नाकाबायोमझी पीटर.

Whats_app_banner