Sanju Samson Injury Finger : टीम इंडियाचा स्टार यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसन याच्या हाताच्या बोटात फ्रॅक्चर झाले असून, त्यामुळे तो एका महिन्याहून अधिक काळ क्रिकेटपासून दूर राहणार आहे. संजू रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीतही खेळू शकणार नाही.
मुंबईत इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याचा चेंडू संजूच्या बोटावर आदळला होता.
सॅमसन तिरुअनंतपुरमला परतला असून नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये रिहॅब पूर्ण केल्यानंतरच तो सरावाला सुरुवात करेल.
या प्रकरणाची माहिती असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) सूत्राने पीटीआयला सांगितले की, 'सॅमसनच्या उजव्या हाताच्या बोटाला फ्रॅक्चर झाले आहे. त्याला नेटमध्ये सराव करायला ५ ते ६ आठवडे लागतील. त्यामुळे ८ ते १२ फेब्रुवारी दरम्यान पुण्यात केरळ वि. जम्मू-काश्मीर रणजी ट्रॉफीच्या क्वार्टर फायनल सामन्यात तो खेळू शकणार नाही. पण आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी त्याचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे.'
इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत सॅमसनची कामगिरी निराशाजनक होती आणि तो एकदिवसीय संघाचा भाग नाही. मुंबई टी-20 सामन्याच्या पहिल्या षटकातील तिसरा चेंडू सॅमसनच्या बोटाला लागला. आर्चरचा हा चेंडू ताशी १५० किमी वेगाचा होता.
चेंडू लागल्यानंतरही संजू सॅमसनने एक षटकार आणि एक चौकार मारला, पण डग-आऊटमध्ये परतल्यानंतर सूज वाढली. स्कॅनमध्ये फ्रॅक्चर दिसून आले.
बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ७ सामन्यांमध्ये३ शतकांमुळे टी-20 मालिका संघात स्थान मिळालेल्या सॅमसनची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवड होऊ शकली नाही.
इंग्लंडविरुद्ध संजू ५ सामन्यांत केवळ ५१ धावा करू शकला. आर्चर, मार्क वुड आणि साकिब महमूद यांच्या शॉर्ट बॉल्सने त्याला सतत त्रास दिला आणि पॉवरप्लेच्या पहिल्या ६ षटकांमध्ये तो सर्व सामन्यात बाद झाला.
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर, भारताला जुलै अखेरपर्यंत कोणतीही मर्यादित षटकांची मालिका खेळायची नाही, त्यामुळे ३० वर्षीय सॅमसनला त्याच्या पुढील संधीसाठी बांगलादेशविरुद्ध ऑगस्टमध्ये होणाऱ्या मालिकेपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.
संबंधित बातम्या