संजू सॅमसन बऱ्याच काळापासून क्रिकेट ॲक्शनपासून दूर आहे. त्याला टीम इंडियाकडून फारशी संधीही मिळत नाही. पण तो सतत चर्चेत असतो. त्याची जगभरात मोठी फॅन फॉलोइंग आहे आणि सोशल मीडियावरही तो सतत ट्रेंडमध्ये राहतो.
संजू सॅमसन आताही चर्चेत आहे. त्याने पुन्हा चाहत्यांची मने जिंकली आहेत. संजू सॅमसन सध्या केरळात असून तो तेथे आयपीएलची तयारी करत आहे. सोबतच त्याने येथे त्याच्या एका लहानग्या चाहत्याची भेट घेतली. या भेटीचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होता आहे. संजूचा हा चिमुकला चाहत दिव्यांग आहे.
काही दिवसांपूर्वी या चाहत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत त्याने संजू सॅमसनला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. हा व्हिडीओ व्हायरल होऊन संजूपर्यंत पोहोचला. यानंतर संजूनेही केरळला परतल्यानंतर त्या मुलाला भेटून त्याचे स्वप्न पूर्ण करण्याची हमी दिली होती.
यानंतर आता संजू सॅमसन त्या मुलाला भेटलाच नाही तर त्याच्यासोबत क्रिकेट खेळण्याचा आनंदही घेतला. सॅमसन या भेटीचा आणि फलंदाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर संजूचे देशाच्या अनेक भागातून कौतुक होत आहेत.
दरम्यान, संजू सॅमसन आयपीएल २०२४ ची तयारी करत आहे. संजू राजस्थान रॉयल्सचा कर्णधार असून राजस्थानचा पहिला सामना २४ मार्च रोजी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध होणार आहे.
सॅमसनने गेल्या महिन्यापासून स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेले नाही. याआधी तो रणजी ट्रॉफीमध्ये केरळकडून खेळत होता.
केरळ बाद फेरीतून बाहेर पडण्यापूर्वी त्याने ५ डावांत १ अर्धशतक झळकावले होते. यापूर्वी अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकमेव टी-२20 सामन्यात संजूला संधी मिळाली होती. पण त्या सामन्यात तो शुन्यावर बाद झाला होता.
मात्र, डिसेंबरमध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात १०८ धावांची खेळी केली होती. हा सामना भारताने ७८ धावांनी जिंकला होता.
संजू सॅमसनचा बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्येही समावेश झाला आहे. संजू सी ग्रेडमध्ये आहे. याआधारे संजूला वर्षाला १ कोटी रूपये मानधन मिळेल.
संजू सॅमसन दीर्घ काळापासून टीम इंडियाच्या योजनांचा भाग आहे. पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये सातत्याने संधी मिळत नाही. मालिकेतील एक सामना खेळल्यानंतर त्याला वगळले जाते. टी-20 वर्ल्डकप २०२२ आणि वनडे वर्ल्डकप २०२३ मध्ये त्याला संधी मिळण्याची शक्यता होती. पण या दोन्हीसाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला नव्हता.