Sandeep Lamichhane : नेपाळचा क्रिकेटपटू संदीप लामिछानेच्या अडचणी वाढल्या आहेत. बलात्कार प्रकरणात दोषी ठरल्यानंतर संदीप लामिछाने याला ८ वर्षांची शिक्षा झाली आहे. अशाप्रकारे संदीप लामिछाने याला ८ वर्षे तुरुंगवास भोगावा लागणार आहे. नेपाळ क्रिकेट संघाव्यतिरिक्त संदीप लामिछाने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा भाग राहिला आहे.
आज बुधवारी (१० जानेवारी) नेपाळी न्यायालयाने संदीप लामिछाने याला शिक्षा सुनावली. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, शिशरराज ढकल यांच्या खंडपीठाने संदीप लामिछाने याला दोषी ठरवून ८ वर्षांची शिक्षा सुनावली. संदीप लामिछाने नेपाळ क्रिकेट संघाचे नेतृत्व केले आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एका १७ वर्षीय तरुणीने संदीप लामिछानेविरोधात काठमांडू येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या मुलीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. हा आरोप झाला, त्यावेळी संदीप वेस्ट इंडिजमध्ये होता आणि कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (CPL) जमैका थलावाहकडून खेळत होता. अटक वॉरंट जारी होताच संदीपला तात्काळ मायदेशात परतण्याचे आदेश देण्यात आले.
मात्र, वॉरंट बजावल्यानंतर संदीप लामिछाने फरार झाला, यानंतर नेपाळ पोलिसांनी संदीपला अटक करण्यासाठी इंटरपोलची मदत घेतली. त्यानंतर इंटरपोलने संदीपविरोधात 'डिफ्यूजन' नोटीस जारी केली होती. काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर संदीप जेव्हा काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला तेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली.
दुसरीकडे, अटक वॉरंट जारी झाल्यानंतर लगेचच नेपाळ क्रिकेट असोसिएशनने (CAN) संदीपलाही निलंबित केले. मात्र, जानेवारी २०२३ मध्ये संदीप लामिछाने याला मोठा दिलासा मिळाला आणि त्याची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर संदीप लामिछाने पुन्हा आंतरराष्ट्रीय आणि फ्रेंचायझी क्रिकेटमध्ये परतला होता.
संबंधित बातम्या