टीम इंडियाचा अंडर-१९ संघ मायदेशात ऑस्ट्रेलियन अंडर-१९ संघाविरुद्ध ३ एकदिवसीय आणि दोन ४ दिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. यासाठी बीसीसीआयने भारतीय अंडर-१९ संघाची घोषणा केली असून यामध्ये भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविड याचीही निवड करण्यात आली आहे.
समित सध्या महाराजा T20 ट्रॉफीमध्ये म्हैसूर वॉरियर्सकडून खेळत आहे. यापूर्वी त्याने कूचबिहार ट्रॉफीमध्ये आपल्या कामगिरीने निवडकर्त्यांना प्रभावित केले होते. आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर संघाला सामना जिंकून देण्याची क्षमता त्याच्यात आहे.
टीम इंडियात निवड होताच समित द्रविडची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. स्टार स्पोर्ट्स कन्नडवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये समित द्रविड बोलताना दिसत आहे.
त्याच्या निवडीबद्दल तो म्हणाला की, माझी १९ वर्षांखालील संघात निवड झाल्यामुळे मी खूप आनंदी आहे. मला संघात स्थान मिळवून दिल्याबद्दल आणि तुमच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. मला खूप छान वाटतं, मी या क्षणासाठी खूप मेहनत केली आहे.
समित द्रविड पुढे म्हणाला की, क्रिकेट ही एक प्रक्रिया आहे. गेल्या काही वर्षांपासून माझी प्रक्रिया सुरू होती. मी स्वप्न जगत आहे. कर्नाटकाच्या आणखी तीन खेळाडूंसह माझे नाव संघात आल्याने मला खूप आनंद झाला आहे.
समित द्रविडचा जन्म १० नोव्हेंबर २००५ रोजी झाला. सध्या तो १८ वर्ष २९६ दिवसांचा आहे. दुखद बाब म्हणजे तो भारतासाठी पुढील अंडर-१९ विश्वचषक खेळू शकणार नाही, कारण पुढील अंडर-१९ विश्वचषक २०२६ मध्ये होणार आहे आणि तोपर्यंत समितचे वय २० पेक्षा जास्त होईल.
या कारणास्तव तो अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. महाराजा T20 ट्रॉफी म्हैसूर वॉरियर्सकडून ७ सामने खेळताना समितने ११४ च्या स्ट्राइक रेटने ८२ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम खेळी ३३ धावांची होती.
यावर्षी खेळल्या गेलेल्या कूचबिहार ट्रॉफीमुळे समित प्रसिद्धीच्या झोतात आला होता. या स्पर्धेत समितने कर्नाटकसाठी केवळ ८ सामन्यांत ३६२ धावा केल्या होत्या आणि १६ बळी घेतले होते. यामुळेच समितला एक दमदार अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जात आहे.
पहिली एकदिवसीय - २१ सप्टेंबर २०२४
दुसरी एकदिवसीय - २३ सप्टेंबर २०२४
तिसरी वनडे – २६ सप्टेंबर २०२४
पहिला चार दिवसीय सामना - ३ ऑक्टोबर २०२४
दुसरा चार दिवसीय सामना - ७ ऑक्टोबर २०२४
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा अंडर-१९ संघ - रुद्र पटेल (उपकर्णधार), साहिल पारख, कार्तिकेय केपी, मोहम्मद अमन (कर्णधार), किरण चोरमले, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंशसिंग पंगालिया (यष्टीरक्षक) , समित द्रविड, युधाजित गुहा, समर्थ एन, निखिल कुमार, चेतन शर्मा, हार्दिक राज, रोहित राजावत आणि मोहम्मद अनन.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ४ दिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा अंडर-१९ संघ – वैभव सूर्यवंशी, नित्या पांड्या, विहान मल्होत्रा (उपकर्णधार), सोहम पटवर्धन (कर्णधार), कार्तिकेय केपी, समित द्रविड, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंशी सिंग पंगालिया (यष्टीरक्षक), चेतन शर्मा, समर्थ एन, आदित्य रावत, निखिल कुमार, अनमोलजीत सिंग, आदित्य सिंग आणि मोहम्मद अनन.