इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2024) १७ व्या मोसमामाला सुरुवात होण्यास आता केवळ १० दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. आयपीएलचा पहिला सामना (२२ मार्च) चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातसामना खेळला जाईल. आाता पर्यंत झालेल्या सर्व आयपीएल सीझनप्रमाणे या मोसमातही काही नवीन टॅलेंट पाहायला मिळणार आहे, यात प्रामुख्याने अनकॅप्ड युवा भारतीय खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे.
आयपीएल २०२४ साठीच्या लिलालात अनेक अनकॅप्ड युवा खेळाडूंवर चांगली बोली लागली. आता ते खेळाडू मिळालेल्या किंमतीप्रमाणेच दर्जेदार कामगिरी करतात की नाही पाहणे रंजक ठरणार आहे.
आपण याठिकाणी अशाच पाच खेळाडूंबाबत जाणून घेणार आहोत, ज्यांना आयपीएल लिलावात कोट्यवधींची किंमत मिळाली आणि ते यंदाचे आयपीएल गाजवू शकतात.
अर्शिन कुलकर्णी हा यावर्षी झालेल्या अंडर १९ वर्ल्डकपचा भाग होता. त्याला लखनौ सुपर जायंट्सने आगामी आयपीएल हंगामासाठी २० लाख रुपयांना विकत घेतले आहे. पण तो अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये काहीच कमाल दाखवू शकला नाही.
कुलकर्णीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आतापर्यंत ६ टी-20 सामन्यांमध्ये १२१ धावा केल्या आहेत आणि ४ बळी घेतले आहेत. याशिवाय अंडर 19 विश्वचषकात त्याने ७ सामन्यात १८९ धावा केल्या होत्या.
गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जने समीर रिझवीला ८ कोटी ४० लाख रुपये खर्चून आपल्या संघात घेतले . रिझवीने गेल्या वर्षी युपी टी-20 लीगमध्ये चमकदार कामगिरी केली होती. याचे फळ त्याला आयपीएल ऑक्शनमध्ये मिळाले. त्याने त्या स्पर्धेत कानपूर सुपरस्टार्सकडून खेळताना ९ डावात २ शतकांसह एकूण ४५५ धावा केल्या होत्या.
यानंतर त्याची चमकदार कामगिरी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२३-२४ मध्ये देखील दिसून आली, ज्यामध्ये त्याने ६९.२५ च्या सरासरीने धावा केल्या. समीरने आतापर्यंत ११ टी-20 सामन्यांमध्ये ४९.१६ च्या सरासरीने २९५ धावा केल्या आहेत.
गुजरात टायटन्सने झारखंडचा २१ वर्षीय युवा यष्टीरक्षक फलंदाज रॉबिन मिन्झला आगामी हंगामासाठी ३.६० कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. मिन्झ हा आक्रमक फलंदाज आहे. मात्र, आतापर्यंत त्याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये झारखंडच्या वरिष्ठ संघातून एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. पण त्याची आक्रमक खेळण्याची शैली गुजरात संघासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते.
झारखंडचा यष्टिरक्षक फलंदाज कुशाग्र कुमारला दिल्ली कॅपिटल्सने ७ कोटी २० लाख रुपयांमध्ये खरेदी केले. देशांतर्गत क्रिकेटमधील कुमार कुशाग्रच्या कामगिरीवर नजर टाकली तर त्याने आतापर्यंत ११ टी-20 सामन्यांमध्ये १४० धावा केल्या आहेत, तर २३ लिस्ट ए सामन्यांमध्ये कुशाग्रने ४६.६६ च्या सरासरीने ७०० धावा केल्या आहेत, ज्यामध्ये ७ अर्धशतकांचा समावेश आहे.
राजस्थान रॉयल्सने देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भाकडून खेळणारा डावखुरा फलंदाज शुभम दुबे याला ५ कोटी ८० लाख रुपयांना खरेदी केले. शुभमने सातत्याने आपल्या कामगिरीने स्वत:ला सिद्ध केले आहे. शुभम दुबे खालच्या क्रमांकावर खेळतो, त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२३-२४ मध्ये चमकदार कामगिरी केली होती. त्याने त्या स्पर्धेत १८७ च्या स्ट्राइक रेटने ७ सामन्यात ७३.६६ च्या सरासरीने २२१ धावा केल्या होत्या. शुभमने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत २० टी-20 सामन्यांमध्ये ४८५ धावा केल्या आहेत.