भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना आजपासून (२६ डिसेंबर) मेलबर्न येथे खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर कमिन्सचा हा निर्णय त्याच्या सलामीवीरांनी अगदी योग्य ठरवला.
१९ वर्षीय नवोदित सॅम कॉन्स्टास याने जसप्रीत बुमराहविरुद्ध काही उत्कृष्ट शॉट्स मारले. डावाच्या सातव्या षटकात, जसप्रीत बुमराहच्या विरोधात कॉन्स्टासने स्विच हिटद्वारे २ आणि १ षटकार मारला.
त्यानंतर ११ व्या षटकात बुमराहच्या षटकात कॉन्स्टासने एकूण १८ धावा ठोकल्या. कॉन्स्टासने आपली झंझावाती फलंदाजी सुरू ठेवत अवघ्या ५२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
ऑस्ट्रेलियाच्या डावातील दहाव्या षटकानंतर मेलबर्न क्रिकेट मैदानावरील वातावरण तापले होते. सॅम कॉन्स्टॅस आणि विराट कोहली यांच्यात जोरदार वाद झाला. खेळपट्टीच्या मध्यभागी कोहली आणि कोन्स्टॅस एकमेकांना धडकले.
यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये वाद सुरू झाला. प्रकरण शांत करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दुसरा सलामीवीर उस्मान ख्वाजासह पंचांना हस्तक्षेप करावा लागला.
सॅम कॉन्स्टास ६६ चेंडूत ६० धावा करून बाद झाला. त्याला रवींद्र जडेजाने पायचीत केले. त्याने आपल्या खेळाडूत ६ चौकार आणि २ षटकार लगावले. हे वृत्त लिहिपर्यंत ऑस्ट्रेलियाने एक बाद ९० धावा केल्या होत्या. उस्मान ख्वाजा आणि मार्नस लॅब्युशेन क्रीजवर होते.
भारत- यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप.
ऑस्ट्रेलिया- उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टास, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड खेळत आहेत