Big Bash League News in Marathi : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात असलेला फलंदाज सॅम कोन्स्टास यानं ऑस्ट्रेलियाचंच नव्हे तर जगाचं लक्ष स्वत:कडं वेधून घेतलं आहे. बिग बॅश लीगमध्ये (BBL) धडाकेबाज पदार्पण करताना त्यानं सर्वात कमी वयात अर्धशतक झळकावण्याचा विक्रम केला आहे. तर, डॅनिएल सॅम्स यानं एका षटकांत ३१ धावा ठोकत मैदान गाजवलं.
सिडनी थंडरकडून बिग बॅश लीगमध्ये त्यानं पदार्पण केलं. कॅनबेरा येथील मनुका ओव्हल मैदानावर झालेल्या सामन्यात कोन्स्टासनं २७ चेंडूत ५६ धावांची खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर सिडनी थंडरनं अॅडलेड स्ट्रायकर्सनं ठेवलेलं १८३ धावांचं लक्ष्य गाठलं.
सिडनी थंडरचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर (७) आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट (६) स्वस्तात बाद झाले, पण सॅम कोन्स्टासनं सिडनीला धडाकेबाज सुरुवात करून दिली. त्यानं अवघ्या २० चेंडूत आपलं अर्धशतक झळकावलं. बिग बॅश लीगमध्ये अर्धशतक झळकावणारा कोन्स्टास इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू (१९ वर्षे ७६ दिवस) आहे. अर्धशतक झळकावल्यानंतर तो लवकर बाद झाला. त्यानं २७ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीनं ५६ धावा केल्या. तो बाद झाल्यानं सिडनी थंडरचा खेळ थंडावला आणि अॅडलेड स्ट्रायकर्सनं पुन्हा सामन्यावर पकड मिळवली.
कोन्स्टास बाद झाल्यानंतर थंडरचा अष्टपैलू डॅनियल सॅम्सनं सूत्रं हातात घेतली. त्यानं सामन्याच्या शेवटच्या षटकात लॉईड पोपच्या चेंडूवर ३१ धावांची स्फोटक खेळी केली. सॅम्सनं षटकाच्या पहिल्या दोन चेंडूत षटकार ठोकले. त्यानंतर प्रेशरमध्ये आलेल्या पोपनं वाइड बॉल टाकला. गोलंदाज दबावाखाली असल्याचं लक्षात येताच डॅनिएलचा आत्मविश्वास वाढला. पुढच्या चार चेंडूंवर तो अक्षरश: तुटून पडला. त्यानं चार चेंडूत ४, ६, ६ आणि ४ धावा केल्या.
कोन्स्टास आणि डॅनिएल सॅम्सच्या फलंदाजीच्या बळावर हातातून गेलेला सामना सिडनी थंडरनं जिंकला. तत्पूर्वी, खेळताना जेमी ओव्हरटनच्या नाबाद ४५ धावांच्या खेळीच्या जोरावर अॅडलेड स्ट्रायकर्सनं निर्धारित २० षटकांत ८ बाद १८२ धावा केल्या होत्या.
बिग बॅश लीगला रविवार, १५ डिसेंबरपासून सुरुवात झाली. मोसमातील पहिला सामना मेलबर्न स्टार्स आणि पर्थ स्कॉर्चर्स यांच्यात खेळला गेला.
सध्या सुरू असलेल्या बीबीएल हंगामात होबार्ट हरिकेन्स आणि ब्रिस्बेन हीट यांचा अद्याप एकही सामना झालेला नाही. पर्थ स्कॉर्चर्स, सिडनी सिक्सर्स, सिडनी थंडर, अॅडलेड स्ट्रायकर्स, मेलबर्न रेनेगेड्स आणि मेलबर्न स्टार्स यांनी प्रत्येकी एक सामना खेळला आहे.
संबंधित बातम्या