Salman butt on India defeat against WI : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत टीम इंडियाच्या पराभवामुळं क्रिकेट विश्वात चर्चेला उधाण आलं आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताचा मागच्या १७ वर्षांतील हा पहिला पराभव आहे. त्यामुळं भारतीय संघावर टीका होत आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट यानं भारतीय संघाला डिवचणारं वक्तव्य केलं आहे.
एका यूट्यूब चॅनेलशी बोलताना सलमान बट यानं भारताच्या पराभवावर भाष्य केलं आहे. ‘वेस्ट इंडिज विरुद्धच्या या पराभवानंतर टीम इंडियाचा आत्मविश्वास नक्कीच डळमळीत होईल,’ असं सलमान बट यानं म्हटलं आहे. आता पराभव झाल्यामुळं भारताकडून अनेक तर्क दिले जातील. ही एक टी-२० मालिका होती. अनेक मोठे खेळाडू संघात नव्हते. भारताचा संघ तुलनेनं तरुण होता, असं सांगितलं जाईल. पण या तर्कांना फार अर्थ नाही. कारण, बऱ्याचदा असाच संघ घेऊन खेळत असतो. तरुण खेळाडूंचा संघ निवडून मैदानात उतरवण्याची भारताची ही पहिली वेळ नाही. शिवाय, भारताचा पराभव करणाऱ्या वेस्ट इंडिजच्या संघातही कोणी दिग्गज नव्हते. भारत त्यांना सहज हरवू शकला असता, असं बट म्हणाला.
'भारताकडं चांगल्या खेळाडूंची कमी नाही. मात्र, ज्या प्रकारची कामगिरी भारतीय संघाकडून अपेक्षित होती, ती झाली नाही. क्रिकेटचा फॉरमॅट कुठला आहे आणि प्रतिस्पर्धी संघ कोणता आहे हे महत्त्वाचं नाही. विजयामुळं पुढील दौऱ्यासाठी संघाचा आत्मविश्वास वाढतो. तर, अशा प्रकारच्या पराभवामुळं संघाच्या आत्मविश्वासाला नक्कीच धक्का बसतो. आत्मविश्वास गमावल्याचं कोणी कॅमेऱ्यासमोर दाखवत नाही, पण देहबोली आणि निर्णयांकडं बघून त्याचा अंदाज लावता येतो, असंही बट म्हणाला.
वेस्ट इंडिज दौऱ्यातील पराभवानंतर आता टीम इंडिया १८ ऑगस्टपासून तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाचं नेतृत्व स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह करणार आहे. आगामी आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धा लक्षात घेऊन या मालिकेपुरती हार्दिक पंड्याला विश्रांती देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या