Saim Ayub Equals Virat Kohli : पाकिस्तानचा युवा सलामीवीर सईम अयूबनं अल्पावधीतच आपल्या खेळीच्या जोरावर अनेकांना प्रभावित केलं आहे. त्याची बॅट सध्या आग ओकत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत सईमनं आणखी एक शतक झळकावत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याच्या एका विक्रमाशी बरोबरी केली आहे.
जोहान्सबर्ग इथं रविवारी झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात सईम अयुबनं ९४ चेंडूत १०१ धावांची खेळी केली. त्यानं १३ चौकार आणि २ षटकार मारले. वनडे कारकिर्दीतील त्याचं हे तिसरं शतक आहे. त्यानं पहिल्याच सामन्यात शतक झळकावलं होतं. अवघ्या २२ वर्षांच्या या खेळाडूनं २०२४ मध्ये परदेशी भूमीवर आपली तिन्ही शतके झळकावली आहेत. या बाबतीत त्यानं विराट कोहलीची बरोबरी केली आहे.
वर्षभरात सर्वाधिक वनडे शतक झळकावणाऱ्या आशियाई फलंदाजांच्या यादीत सईमनं कोहलीची बरोबरी केली आहे. कोहलीनं २०१८ आणि २०१९ मध्ये परदेशात तीन वनडे शतके झळकावली होती. सचिन तेंडुलकर (२००१), राहुल द्रविड (१९९९), मोहम्मद हफीज (२०११) आणि सलीम इलाही (२००२) या आशियाई खेळाडूंनीही वर्षभरात तीन वनडे शतके झळकावली आहेत. एका वर्षात सर्वाधिक वनडे शतक करण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. त्यानं २०१९ मध्ये ६ शतके झळकावली होती. त्याखालोखाल सनथ जयसूर्या (२००६) आणि कुमार संगकारा (२०१५) यांनी प्रत्येकी पाच शतकं झळकावली आहेत.
अनुभवी फलंदाज बाबर आझम यानं दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तानच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावलं. त्यानं ७१ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीनं ५२ धावा केल्या. बाबरनं आपलं ३४ वं वनडे अर्धशतक झळकावलं आहे. दुसऱ्या सामन्यातही त्यानं अर्धशतक झळकावलं होतं. रविवारी अर्धशतक झळकावूनही बाबरला विक्रमापासून वंचित राहावं लागलं.
एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात कमी डावात सहा हजार धावा पूर्ण करण्यापासून तो सध्या केवळ ४३ धावा दूर आहे. त्याच्या नावावर सध्या १२५ वनडे सामन्यात ५९५७ धावा आहेत. वनडे मालिकेत निर्विवाद आघाडी घेणाऱ्या पाकिस्तान संघानं शेवटच्या सामन्यात ९ बाद ३०८ धावा केल्या होत्या. कर्णधार मोहम्मद रिझवाननं (५३) अर्धशतक झळकावलं.
संबंधित बातम्या