Ind vs Eng 2nd Test: यशस्वी जयस्वालच्या विक्रमी द्विशतकानंतर भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इंग्लंडच्या फलंदाजांच्या नाकी नऊ आणले. बुमराहने उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडच्या संघाला २५३ धावांवर रोखले. यासह बुमराहने कसोटी क्रिकेटमधील १५० विकेटचा टप्पा देखील पूर्ण केला आहे. तसेच दहा वेळा पाच विकेट्सचा टप्पा गाठला. दुसऱ्या दिवसअखेर भारताने १७१ धावांची आघाडी मिळवली. जसप्रीत बुमराहची गोलंदाजी पाहून भारताचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि रवी शास्त्री यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
विशाखापट्टणमची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अनुकल असल्याचे बोलले जाते. मात्र, तरीही बुमराहने १५.५ षटकांत ४५ धावांत ६ विकेट घेत सगळ्यांना आश्चर्यचकीत केले, जिथे त्याच्या सर्व विकेट्स ७१ चेंडूंच्या आत पडल्या, त्यापैकी तीन अत्यंत चित्तथरारक होत्या. रिव्हर्स स्विंगची अपेक्षा बाळगणाऱ्या जो रूटला उलट्या स्विंगने बाद केले, इंग्लंडचा पहिला कसोटी हिरो ओली पोपकडे बुमराच्या यॉर्करचे उत्तर नव्हते. तर, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स यानेही बुमराहसमोर गुडघे टेकले.
भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टॉम हार्टलीच्या रुपात बुमराहने सहावा विकेट घेतल्यानंतर सर्वप्रथम प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, 'एका स्पेशल बॉलरकडून आनंदाची गोष्ट. बूम बूम फक्त शानदार जसप्रीत बुमराह93 #Bumrah #INDvsENG, अशी त्यांनी पोस्ट केली.
त्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सोशल मीडियाच्या माध्यमातून बुमराहला कसोटी कारकिर्दीतील तिसरी सर्वोत्तम गोलंदाजी नोंदवल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
बुमराहने ४५ धावांत ६ विकेट घेणे ही भारतीय वेगवान गोलंदाजाची घरच्या मैदानावरील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. बुमराहने एका कसोटी डावात पाचपेक्षा जास्त विकेट घेण्याची ही चौथी वेळ आहे. बुमराहच्या धडाकेबाज खेळीनंतर यशस्वीने सकाळी जिथून माघार घेतली तिथून चढाई करत भारताच्या दुसऱ्या डावाची आश्वासक सुरुवात केली. डावखुऱ्या फलंदाजाने कर्णधार रोहित शर्माच्या साथीने दुसऱ्या दिवसाचा शेवट विनानुकसान २८ धावांवर केला आणि भारताने १७१ धावांची भक्कम आघाडी मिळवली.