मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सध्या काश्मीर दौऱ्यावर आहे. या दौऱ्याचे सचिनचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडीओत तो स्थानिक लोकांसोबत रस्त्यावर क्रिकेट खेळताना दिसला होता.
आता या काश्मीर दौऱ्याचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सचिननेच त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काश्मीरमधील हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये 'क्रिकेटचा देव' त्याच्या खास चाहत्याला आणि एका खऱ्या हिरोला भेटताना दिसत आहे.
वास्तविक, या व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकर दिव्यांग क्रिकेटर आमिर हुसेनला भेटताना दिसत आहे. आमिरला दोन्ही हात नाहीत. तो खांदा आणि मानेमध्ये बॅट पकडून फलंदाजी करतो. काही महिन्यांपूर्वीच आमिरचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता, हा व्हिडीओ शेअर करून सचिनने आमिरचे कौतुक केले होते.
दरम्यान, आताच्या व्हिडिओमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन आमिरशी बोलताना दिसत आहे. सचिन आमिरच्या भावनांचे कौतुक करत त्याला खरा हिरो म्हणताना दिसत आहे. सचिनला भेटल्यानंतर आणि सचिन आपले कौतुक करत असल्याचे ऐकून आणि पाहून आमिर थोडासा भावूक झालेला दिसत आहे.
सचिनने आमिरशी बराच वेळ बसून बोलून त्याच्या संघर्षाबद्दल बरेच काही जाणून घेतले. यासोबतच त्याने आपल्या जबरा फॅनला एक खास भेटही दिली आहे. सचिनने आमिरला भेट म्हणून बॅट दिली. व्हिडिओमध्ये सचिनही आमिरसोबत त्याचा आवडता शॉट, कव्हर ड्राईव्ह खेळताना दिसत आहे.
आमिर हुसैनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, तेव्हा त्याने सचिन आपला आदर्श असल्याचे म्हटले होते. यानंतर मास्टर ब्लास्टरने ट्विट करून आमिरचे कौतुक केले आणि लवकरच भेटण्याचे आश्वासन दिले होते, आता सचिन खास आमिरला भेटायला काश्मीरला पोहोचला आहे.