टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज डेव्हिड ज्युड जॉन्सन यांचा आज (२० जून) मृत्यू झाला. जॉन्सन यांचा २० जून (गुरुवार) रोजी त्यांच्या अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरील बाल्कनीतून पडून मृत्यू झाला. जॉन्सन ५२ वर्षांचे होते. जॉन्सन यांची मानसिक स्थिती ठीक नव्हती, त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात होते.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. कोणताही गैरप्रकार घडला नसल्याचा संशय व्यक्त करत स्थानिक पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
डेव्हिड जॉनसन कनका येथील त्याच्या अपार्टमेंटबाहेर मृतावस्थेत आढळला. प्राथमिक माहितीनुसार, जॉन्सन आपल्या अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरील कॉरिडॉरवरून खाली पडले.
दरम्यान, डेव्हिड जॉनसन यांच्या निधनानंतर अनेक क्रिकेटपटूंनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर यांच्यासह भारतीय क्रिकेट जगतातील सदस्यांनी भारताचे माजी क्रिकेटपटू डेव्हिड जॉन्सन यांच्या दुर्दैवी निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
एक्सवर दिग्गज क्रिकेटपटू तेंडुलकरने जॉन्सनसोबतच्या आपल्या खेळाच्या दिवसांची आठवण सांगितली. 'माझे माजी सहकारी डेव्हिड जॉन्सन यांच्या निधनाने खूप दु:ख झाले आहे. तो जीवनाने परिपूर्ण होता आणि त्याने मैदानावर कधीही हार मानली नाही. माझ्या संवेदना मित्राच्या परिवारासोबत आहेत,' असे सचिन म्हणाला.
भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरनेही जॉनसन यांच्या अकाली निधनावर शोक व्यक्त केला आहे. डेव्हिड जॉन्सन यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना आणि प्रियजनांना शक्ती देवो,' असे गंभीरने म्हटले आहे.
याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेनेही पोस्ट लिहिली आहे. 'माझा क्रिकेटमधील सहकारी डेव्हिड जॉन्सन यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दु:ख झाले. त्यांच्या कुटुंबियांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. खूप लवकर गेला 'बेनी'!.
डेव्हिड जॉनसन हे कर्नाटकाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळले. तेथे प्रभावी कामगिरी करून त्यांनी टीम इंडियात एन्ट्री घेतली होती. डेव्हिड जॉनसन यांनी १९९५-९६ च्या रणजी करंडक स्पर्धेत केरळविरुद्ध १५२ धावांत १० बळी घेतले होते.
तसेच, त्यांनी १९९६ मध्ये दिल्लीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ कसोटी सामन्यातून बाहेर पडल्यानंतर जॉन्सनला राष्ट्रीय संघात स्थान देण्यात आले होते. जॉन्सन यांनी टीम इंडियासोबत दक्षिण आफ्रिकेचा दौराही केला होता. डेव्हिड जॉनसन यांनी भारताकडून दोन कसोटी सामन्यांत ३ विकेट्स घेतल्या होत्या.