मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकर डीपफेकचा शिकार, बनावट व्हिडीओत नेमकं काय? पाहा

Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकर डीपफेकचा शिकार, बनावट व्हिडीओत नेमकं काय? पाहा

Jan 15, 2024 03:18 PM IST

Sachin Tendulkar Deepfake Video : सचिनच्या आवाजातील हा व्हिडीओ आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये सचिन गेमिंग अ‍ॅपचे प्रमोशन करताना म्हणतोय, की त्याची मुलगीही हा गेम खेळते

Sachin Tendulkar Deepfake Video
Sachin Tendulkar Deepfake Video (AFP)

प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा काही दिवसांपूर्वीच एक डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर सर्वच सेलिब्रेटींनी या प्रकाराबाबत चिंता आणि नाराजी व्यक्त केली होती.

ट्रेंडिंग न्यूज

पण आता असाच काहीसा प्रकार माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरसोबत घडला आहे. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही डीपफेकचा बळी ठरला आहे. त्याचा फेक एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो 'स्कायवर्ड एव्हिएटर क्वेस्ट' या गेमिंग अ‍ॅपची जाहिरात करताना दिसत आहे.

सचिनच्या डीपफेक व्हिडीओत काय?

सचिनच्या आवाजातील हा व्हिडीओ आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये सचिन गेमिंग अ‍ॅपचे प्रमोशन करताना म्हणतोय, की त्याची मुलगीही हा गेम खेळते.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सचिन चांगलाच हादरला आहे. हा व्हिडिओ एक्सवर पोस्ट करत सचिनने तो पूर्णपणे बनावट असल्याचे सांगितले आहे.

सचिनने व्हिडिओ पोस्ट करून लिहिले की, हा व्हिडिओ खोटा असून तुम्हाला फसवण्यासाठी बनवण्यात आला आहे. तंत्रज्ञानाचा गैरवापर करण्याचा हा प्रकार पूर्णपणे चुकीचा आहे. सचिनने ही पोस्ट भारत सरकार, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर आणि महाराष्ट्र सायबर पोलिसांना टॅग केली आहे.

डीपफेक व्हिडिओंच्या सहाय्याने सोशल मीडियावरून पसरवली जाणारी चुकीची माहिती जगभरात चिंतेचा विषय बनली आहे आणि अलीकडे भारतात अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये रश्मिका मंदानाचा एक डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत रश्मिकाचा चेहरा एआय तंत्रज्ञानाचा वापर करून मॉर्फ करण्यात आला होता. सोशल मीडियावर हजारो लोकांनी रश्मिकाचा हा फेक व्हिडिओ खरा मानला होता, कारण त्या व्हिडीओत दिसणारे एक्सप्रेशन अगदी खरे वाटत होते.

डीपफेक म्हणजे काय, हे व्हिडीओ कसे बनवले जातात?

डीपफेक हा शब्द पहिल्यांदा २०१७ मध्ये वापरला गेला. त्यावेळी अमेरिकेतील एका सोशल साइटवर सेलिब्रेटींचे असे अनेक डीपफेक व्हिडीओ पोस्ट करण्यात आले होते. यात एम्मा वॉटसन, गॅल गॅडॉट, स्कार्लेट जॉन्सन या अभिनेत्रींचे अनेक पॉर्न व्हिडिओ होते.

खऱ्या व्हिडिओ, फोटो किंवा ऑडिओमध्ये दुसऱ्याचा चेहरा, आवाज आणि हावभाव फिट करणे याला डीपफेक म्हणतात. हे इतके स्पष्टपणे घडते की कोणीही त्यावर विश्वास ठेवू शकेल. यामध्ये नकलीदेखील अगदी खऱ्यासारखे दिसते.

यामध्ये मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेतली जाते. यामध्ये तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने व्हिडिओ आणि ऑडिओ तयार केले जातात.

टी-२० वर्ल्डकप २०२४